पालघर जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमधील बोरमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावांतील ग्रामीण व आदिवासी समाजासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट थांबणार आहे.
प्रकल्पांचे लार्सन अॅण्ड टुब्रो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात आले. एलटीपीसीटीची भागीदार ग्रामऊर्जातर्फे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.या प्रकल्पामध्ये नव्या बोअर वेल्स, सौर ऊर्जा पाण्याचे पंप, पाइपलाइन, साठवणूक टाकी, वितरण पाइपलाइन आणि पाणी वितरण स्टॅण्ड यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दोन गावांचा समावेश करण्यात आला होता व यापुढे पालघर जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमधील आणखी गावांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. पाण्याचा खात्रीशीर स्रोत, पाण्याचा दर्जा, पाण्याची मागणी आणि पाणी काढण्यासाठी स्त्रियांना करावा लागणारा त्रास इत्यादी बाबी लक्षात घेऊन सुथेडपाडा आणि भेंडीपाडय़ासाठी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा स्थापन करण्यात आली.