|| हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलादपूरमधील देवळे ग्रामस्थांची व्यथा

शासनाने चार कोटी रुपये खर्च करून गावात धरण बांधले. गावाला मुबलक पाणी मिळेल या आशेने गावकऱ्यांनी कवडीमोल दामाने जागा दिली, धरण पूर्ण होऊन १५ वर्षे लोटली, मात्र गावाला पाणी काही मिळाले नाही, निकृष्ट बांधकामामुळे धरणात पाणीसाठाच होऊ शकला नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामस्थांची झाली आहे.

शासनाच्या जलसंधारण (लघु पाटबंधारे विभाग) विभागाकडून या धरणाचे बांधकाम करण्यात आले. १९८३ साली धरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष काम सुरू व्हायला १९९७ साल उजाडले. तर २००३ साली धरणाचे काम पूर्णत्वास गेले. धरणाच्या बांधकामासाठी  आजवर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये खर्च झाला. २९ शेतकऱ्यांनी कवडीमोलाने आपल्या पिकत्या जमिनी धरणासाठी दिल्या.  गावात धरण झाले तर शेतीला बारमाही पाणी मिळेल, गावात सुबत्ता येईल, गावकऱ्यांना नोकरीधंद्यासाठी मुंबई, पुणे, सुरत, बडोदा यांसारख्या शहरांत जावे लागणार नाही, अशी त्यांची अपेक्षा होती.

मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन आज जवळपास १५ वर्षे लोटली आहेत. धरणाचा काडीमात्र उपयोग गावकऱ्यांना झाला नाही. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धरणाला पहिल्या वर्षीपासूनच मोठी गळती लागली. पावसाळ्यात ओसंडून वाहणारे हे धरण पावसाळ्यानंतर मात्र कोरड पडण्यास सुरुवात होते. गळतीमुळे अवघ्या दोन महिन्यांत पाणीसाठा नष्ट होतो. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे.

धरणाची दुरुस्ती व्हावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. मात्र शासनदरबारी त्याची दखलही घेतली गेली नाही. सुनील तटकरे राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री झाल्यावर देवळे धरणाचे भोग संपतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यांनी बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पांच्या कामात अधिक रस दाखवला. नंतरच्या काळात आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद गेले आणि शासनदरबारी देवळे धरण आणि ग्रामस्थांची उपेक्षा तशीच सुरू राहिली. यानंतर २०१४ मध्ये देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने तत्कालीन सरपंचांनी हा प्रश्न आमसभेत उपस्थित केला.  यानंतर धरणाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मुख्य अभियंता (ल.पा.स्थानिक स्तर) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले गेले. आज या घटनेलाही तीन वर्षे लोटली आहेत. धरण दुरुस्ती फाइल मात्र गाळात रुतून बसली आहे. दहा गावांना पाणी पुरवेल एवढे मोठे धरण गावात आहे. मात्र उन्हाळ्यात हंडापाण्याची मोताज आहे अशी गत देवळेवासीयांची आहे. धरणाच्या कामाची चौकशी करा आणि त्याआधी धरणाची दुरुस्ती करा एवढी माफक अपेक्षा त्यांची आहे.

२०३ हेक्टर सिंचनक्षमता असणारे  धरण

  • प्रकल्पाचे काम १९९७ रोजी सुरू करण्यात आले. एकूण २०३ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या या धरणाचा फायदा देवळे, बोरज, पितळवाडी, चाळीचा कोंड येथील शेतकऱ्यांनाहोणार होता. सुरुवातीला एस. पी. रेड्डी ठेकेदार होते. नंतर संबंधित खात्याने ठेकेदार बदलून हे काम सुरू ठेवले.
  • २००३ साली हे काम पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित ठेकेदाराला ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपयांचे बिल अदा करण्यात आले.

‘सतत पाठपुरावा करूनही संबंधित खाते या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तातडीने देवळे धरण दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.’    – गुणाजी दळवी, स्थानिक रहिवासी

‘धरणासाठी ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले अशा भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अजून प्रकल्पग्रस्त शेतकरी असल्याचा दाखला दिला गेला नाही. आणि सिंचनासाठी धरणाची उभारणी झाली असली तरी एक एकर शेती ओलिताखाली आली नाही.’    – प्रकाश कदम, स्थानिक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in maharashtra
First published on: 20-05-2019 at 00:19 IST