अलिबाग- रायगड जिल्ह्यात २७९ गावे आणि वाड्यामध्ये सध्या पाणी टंचाई आहे. या गावं आणि वाड्यांना सध्या ४० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र जलजीवन मिशनच्या योजनामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या लक्षणीय घटल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या १२० ने घटली आहे. जलजीवन योजनेतील अनेक योजनांची कामे अंतिम टप्प्यात असल्याने पुढील वर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या लक्षणीय घटेल असा विश्वास प्रशासकीय यंत्रणांना वाटतो आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र नियोजना आभावी हे पाणी समुद्रात वाहून जाते. फेब्रुवारी अखेर पर्यंत जिल्ह्यातील नद्या, ओढे कोरडे पडू लगतात. आणि उन्हाळ्यात अनेक गावात भिषण टंचाई उद्भवते, पावसाळ्यात पाणीदार असलेली गावे उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करतांना दिसतात. यावर्षी जिल्ह्यातील ४० गावे आणि २३८ वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. जवळपास १ लाख ११ हजार २३१ लोकसंख्येला पाणी टंचाईची झळ बसली. त्यामुळे चाळीस टँकर व्दारे या गावे आणि वाड्यांना पाणी पुरवठा करावा लागला.
असे असले तरी गेल्या वर्षीच्या यावर्षी टंचाईग्रस्त गावाच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ९२ गावे आणि ३०१ वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य पहायला मिळाले होते. १ लाख २१ हजारहून अधिक लोकसंख्येला या टंचाईची झळ बसली होती. त्यामुळे ५८ टँकर व्दारे पाणी पुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १२० गावे आणि वाड्या यंदा टंचाई मुक्त झाल्या आहेत. जलजीवन योजनांमुळे टंचाई ग्रस्त गावांची संख्या लक्षणीय घटली आहे.
जलजीवन मिशन योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यात १ हजार ४९६ योजनां मंजूरी देण्यात आली होती. यापैकी ५६७ योजना पूर्ण झाल्या आहेत. तर अन्य २०० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पूढील वर्षी जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्ये आणखिन घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जलजीवन योजनामुळे गावातच पाण्याचे स्त्रोत निर्माण करून त्यांचे बळकटीकरण केले जात आहे. त्यामुळे अनेक गावे आणि वाड्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्या आहेत. यावर्षभरात उर्वरीत सर्व कामे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग…