सांगली: सांगली शहरातील हिराबागमधून जलभवन व विश्रामबाग परिसराला पाणी पुरवठा करणारा पंप नादुरुस्त झाल्याने तर मिरजेतील कृष्णाघाट येथून येणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

काही अपुऱ्या पाण्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी सोमवारी केले.

सांगलीतील हिराबागमधून जलभवन व विश्रामबाग जलकुंभासाठी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीवरील पंप नादुरुस्त झाला असून पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याने पाणीपुरवठा अपुरा होणार आहे. यामुळे चांदणी चौक, जलभवन परिसर, धामणी रस्ता, दत्तनगर, गणपती मंदिर, वालचंद महाविद्यालय आदी परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. पंप दुरुस्तीसाठी तीन दिवसाचा अवधी लागणार आहे.

तर मिरजेत शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे मिरज जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

मिरज परिसरात टाक्या भरण्यासाठी उशीर होत असल्याने मिरज व अन्य भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.गळती दुरुस्त करण्यासाठी मंगळवार, दि. १३ रोजी काम सुरू करण्यात येणार आहे. या दरम्यान, उपलब्ध पाणी नागरिकांनी काटकसरीने वापरावे असे आवाहन कार्यकारी अभियंता कुरणे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.