पंढरपूर : गेले सहा महिन्यांपासून पडत असलेला पाऊस यंदा थांबायचे नाव घेत नसल्याने यंदा नोव्हेंबर महिन्यात आलेल्या कार्तिकी यात्रेसाठी चक्क जलरोधक दर्शन मंडप उभा करण्याची वेळ आली आहे. एरवी दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या आषाढी यात्रेसाठी असा मंडप घातला जात असे, मात्र कार्तिकीसाठी प्रथमच असा मंडप घालण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. येत्या २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या काळात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कार्तिक वारीला मुंबई, कोकण, मराठवाड्यासह परराज्यातून दरवर्षी लाखो भाविक पंढरीत येतात. यात्रा कालावधीत या भाविकांसाठी दर्शन रांग तयार करताना दरवर्षी केवळ उन्हासाठी कापड लावून मंडप घातला जातो. मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने यंदाच्या कार्तिक वारीसाठी वरील काळजी घेण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रेसाठी काही लाख भाविक येतात. यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागणारी भाविकांची रांग ही काही किलोमीटर लांबवर जाते. यामध्ये सुरुवातीचा काही भाग हा पत्रे लावून तयार केला जातो. मात्र यानंतर केवळ कापड लावत साधा मांडव घातला जाई. यंदा या केवळ कापड लावण्याऐवजी या मांडवावर मंदिर समितीच्या वतीने जलरोधक (वॉटरप्रूफ) दर्शन मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत मंदिर समितीने पहिल्यांदाच बदल केला आहे. दर्शनरांगेसाठी १२ पत्रा शेड उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर जलरोधक (वॉटरप्रूफ) दर्शन मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून पाऊस जर पडला तर भाविकांना या पावसाचा त्रास होणार नाही. आषाढी यात्रेच्या वेळेस पावसाळा असतो. त्यावेळेस अशा प्रकारची व्यवस्था दरवर्षी समितीच्या मार्फत करण्यात येते. मात्र पंढरीत कार्तिकीसाठी यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यवस्था केली आहे.
दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व जलद होण्यासाठी म्हणून विशेष उपाययोजना समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे. याशिवाय, आरोग्य विभागामार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व रिध्दी सिध्दी दर्शनमंडप येथे आयसीयू, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे ‘चेंजिंग रूम’ उभारण्यात येत आहेत.
मोठा बंदोबस्त, सुरक्षाव्यवस्था
याशिवाय, सोलापूर महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक तिच्या ‘रेस्क्यू व्हॅन’सह वारीत उपस्थित राहणार आहे. अग्निशमन यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, अत्याधुनिक १२५ सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन आदी व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
