दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जंयतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडलं आहे. हेही वाचा >> Video : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले… "सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्यअतिशय दुर्दैवी! आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेण-गोळे सहन करून मोठा त्याग केला व ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना! मला या लोकांच्या बुद्धीची कीव येते! अहो आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय! जाहीर निषेध!", असं ट्विट छगन भुजबळ यांनी केलं आहे. हेही वाचा >> “दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून ‘या’ दोन विभूतींचा पुतळा हटवला”, रुपाली चाकणकरांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “इतिहास नाकारण्याची…” एकनाथ शिंदे यांनी काय दिली प्रतिक्रिया? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आणि आदरनीय आहेत. त्यांच्याविषयीचा आदर प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचा अनादर होणार नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असून ते याबाबतचा खुलासा करणार आहेत. शेवटी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले हे आमच्यासाठी फार आदरास्थानी आहेत.” दिल्लीहून ते रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.