दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जंयतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

रुपाली चाकणकरांनी काय दावा केला होता?

“आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे”, असं ट्विट रुपाली चाकणकरांनी केलं होतं. त्यानंतर अनेक विरोधकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

हेही वाचा >> “दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून ‘या’ दोन विभूतींचा पुतळा हटवला”, रुपाली चाकणकरांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “इतिहास नाकारण्याची…”

एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं?

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आणि आदरनीय आहेत. त्यांच्याविषयीचा आदर प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचा अनादर होणार नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असून ते याबाबतचा खुलासा करणार आहेत. शेवटी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले हे आमच्यासाठी फार आदरास्थानी आहेत.” दिल्लीहून ते रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत मंत्री उदय सामंत यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, “या प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. हे प्रकरण संवेदनशील आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे या प्रकरणी माहिती घेऊन बोलणं योग्य ठरेल.”