जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन करतानाच मजलिस-ए-इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल भाजपवर जोरदार टीका केली. फुटीरतावादी नेता मसरत आलम याने काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला. ‘ही घटना भाजप सत्तेत असताना घडली आहे. ते सत्तेत नसते तर त्यांनी केवढा ‘खेळ’ केला असता. ‘चला, काश्मीरमध्ये जाऊ, तिरंगा फडकवू’ असे वातावरण निर्माण केले असते. पण सत्तेत असताना नेमस्त राजकारण आणि सत्ता नसली की आक्रमक असे भाजपचे धोरण आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर काश्मीरमधील मानवी हक्काचे संरक्षण व्हायला हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्याचवेळी एमआयएम म्हणजे रझाकार असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
आपल्या आक्रमक भाषण शैलीने मुस्लिम तरुणांच्या मनावर गारुड घालणारे ओवेसी सध्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दलित-मुस्लिम सूत्रासह उतरले आहेत. त्या निमित्ताने मराठवाडय़ाचा हैदराबादशी असलेला ऐतिहासिक संबंध, एमआयएम म्हटल्यावर ‘त्यांना’ रझाकार असे संबोधले जाणे, अशा विविध बाबींवर ‘लोकसत्ता’ने त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या खास हैदराबादी हिंदीत दिलेल्या उत्तरांचा अनुवाद..

*मराठवाडय़ात अनेकांना एमआयएम म्हटले की रझाकार आठवतात!
-आमचा रझाकारांशी कोणताही संबंध नाही. आम्ही जिना यांच्या द्विराष्ट्र संकल्पनेला विरोध करणारी माणसे आहोत. जे रझाकार होते ते पाकिस्तानला निघून गेले. आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आमच्या देशप्रेमावर कोणतेही प्रश्नचिन्ह लावता येणार नाही. त्या वेळी घडलेल्या घटनेबाबत पंडित सुंदरलाल समितीची नियुक्ती करण्यात आली. सुमारे ३० हजार मुस्लिमांचा नरसंहार झाल्याचे त्यात म्हटले आहे. तो अहवाल जनतेसमोर खुला करावा.

*भाजपसह अनेक पक्ष समान नागरी कायदा व्हावा, असे सांगत असतात. तुमचे यावर काय मत आहे?
– आम्ही आमच्या धर्मातील लोकांना समजावून सांगू लागलो आहोत की, महिलांवर अत्याचार होईल, असे वागू नका. आमच्यातही सुधारणा सुरू आहेत. पण या देशात एवढी विविधता आहे की, तेथे एकच एक कायदा कसा लागू होईल? गोवा-ईशान्य भारतातील राज्यांत विवाहासह अनेक प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा मुस्लिमांना कधीही मान्य होणार नाही.

*एमआयएमवर मॅनेज होण्याचे आरोप होतात. काँग्रेसकडून तर कधी युतीकडून मॅनेज झाल्याची चर्चा असते, असे का?
– आम्ही काँग्रेसबरोबर ८ वर्षे होतो. अणुकराराच्या मुद्दय़ावर लोकसभेत अविश्वास आणला होता, तेव्हा आम्ही काँग्रेसला पािठबा दिला होता. तेव्हा त्यांच्याकडून काय पैसे घेतले होते काय? आंध्र प्रदेशमध्ये सरकार वाचविताना काँग्रेस सरकारला रेड्डींच्या धर्मनिरपेक्षतेकडे पाहून आम्ही सहकार्य केले होते. तेव्हा त्यांच्या अध्यक्षांच्या खुर्चीला खुर्ची चिकटून आम्हाला बसविले जायचे, तेव्हा आम्ही कधी पसे घेतले होते? आम्ही मॅनेज होतो हे साफ चूक आहे. त्यांना नाचता येत नाही. अंगण वाकडे आहे, असे म्हणून काय उपयोग?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*तुमच्या पक्षाची दुसरी फळी तोडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत काँग्रेस काम करते आहे का?
– तसे काही नाही. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. किती जागा मिळतील, हे मात्र लगेच सांगता येणार नाही.