बहुप्रतिक्षित आणि बहुप्रतिष्ठीत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर यंदाही उभे ठाकले आहेत. दादरच्या शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे दसरा मेळावा घेण्याकरता दोन्ही गटांकडून मुंबई महापालिकेला अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका कोणाच्या बाजूने कौल देतेय हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरे गटावर तोफ डागली आहे.

“दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत मुंबई पालिकेच्या आयुक्तांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. सरकार म्हणून आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही. जे सांगतात की आम्ही दबावाचं राजकारण करतो, तर मग मुंबई आयुक्तांना बोलावून एका सेकंदात आम्ही निर्णय घेऊ शकतो. पण योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा असं आम्ही वारंवार सांगतोय”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकाऱ्यावर दबाव असू नये. जर त्यांनी (पालिकेने) परवानगी नाकारली किंवा कोणीही आम्हाला मिळालेल्या परवानगीविरोधात कोर्टात गेलं तर पर्यायी व्यवस्था म्हणून दोन ते तीन ठिकाणांच्या जागा तयार केलेल्या आहेत. परंतु, एक निश्चित आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार मांडण्यासाठी, शिवसेना प्रमुखांची शिवशाही सांगण्यासाठी, त्या दिवसाचं असलेलं महत्त्व राखण्यासाठी शिवसेनेचा दसरा मेळावा दणदणीतच होणार आहे”, असंही शिरसाट म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवीतर्थ मिळावे याकरता ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आणि मुंबई पालिकेकडून ठाकरे गटालाच परवानगी मिळणार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय. याबाबत ते निश्चिंत आहे. परंतु, शिंदे गटाकडून इतर जागांची चाचपणी केली जातेय. यावरून शिरसाटांना विचारले असता ते म्हणाले की, “दसरा मेळावा झाला नाही तर त्यांना काही फरक पडत नाही. परंतु, दसरा मेळावा आम्हाला करायचाच आहे, ही भूमिका असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतोय.”