मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार-पाच वर्षांपासून आंदोलनं करत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ते दुसऱ्यांदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील हे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उपोषणाला बसले होते. तेव्हा राज्य सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, राज्य सरकारने ही मुदत पाळली नाही. त्यामुळे जरांगे पाटील हे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खूप खालावली आहे. त्यामुळे राज्यभरातून राज्य सरकारबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत मराठा आंदोलकांना भावनिक संदेश दिला आहे.

मनोज जरांगे पाटील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जालन्यातील अंतरवाली सराटी गावात शेकडो मराठा आंदोलकांसह उपोषणाला बसले होते. त्यावेळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांना एक भावनिक संदेश दिला आहे.

मनसेने मराठा आंदोलकांना दिलेल्या संदेशात म्हटलं आहे, गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये! (गड्यांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. आरक्षणाची मोहीम फत्ते होईपर्यंत या निगरगठ्ठ नेत्यांपुढे आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र – मनोज जरांगे पाटील खर्ची पडता कामा नये) आपल्या महाराष्ट्र पुत्राचा जीव न गमावता जिंकेपर्यंत आपण झुंजत राहू या!

हे ही वाचा >> मराठा आरक्षणप्रश्नी बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, अशोक चव्हाण म्हणाले, “त्यांच्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…अन् जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले

दरम्यान, काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. जरांगे पाटील म्हणाले, “मला मराठा समाजापेक्षा कुणीही मोठं नाही, कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो.” यावेळी त्यांना उपस्थित मराठा आंदोलकांनी, वृद्धांन पाणी पिण्याची विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली आणि घोटभर पाणी प्यायल. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे.