एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचं दुःख आम्ही समजू शकतो. भविष्यात जेव्हा सगळं चांगलं होईल तेव्हा तुम्हाला अपराधी वाटता कामा नये, की त्यावेळी आपण काय बोलून गेलो? मराठी शब्द वापरताना थोडे जपून वापरा. काही घटना नक्की घडल्या मात्र त्यांचा विचार होईल आणि त्यावर योग्य ते उपाय योजले जातील असंही आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पक्षावर राग काढू नका असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपलं घर आहे, घरातलं भांडण रस्त्यावर नको असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी ज्याप्रकारे पक्ष वाढवला त्याची जाणीव भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे हे कायम माझ्या पाठिशी उभे राहिले. शरद पवारांवर टीका करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं मात्र त्यांनी कधीही त्यांचा अनादर केला नाही. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही वाटचाल करतो आहोत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे हे भरल्या ताटावरुन गेले असं म्हटलं जातं ते खरंच आहे. ते अचानक आपल्यातून निघून गेले. भाजपा हा पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भाषण करण्याआधी पंकजा मुंडे यांनी माईक हाती घेत कुणीही चंद्रकांत पाटील यांच्या भाषणात व्यत्यय आणू नये असं आवाहन केलं.
१२ डिसेंबर असल्याने गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळी व्यासपीठावर भाजपातल्या दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी त्यांची खदखद बोलून दाखवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी घरातलं भांडण घरात मिटवा असा सल्ला दिला.