कराड : कराड व मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक होणार आहे. दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी कराड शहरातील सर्व ७४ तर, मलकापूरमधील ३३ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा देताना, ‘वेब कास्टिंग’ म्हणजेच इंटरनेटद्वारे मतदान केंद्रांवरील हालचालींचे संग्रहण होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड पालिकेच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले की, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर हे मला सहायक आहेत. कराडमध्ये ६९ हजार ८३६ मतदार असून, निवडणुकीसाठी १५ प्रभाग निश्चित आहेत. त्यातून ३१ सदस्य व नगराध्यक्ष निवडला जाईल. येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह मुख्य कार्यालय करण्यात आले आहे. निवडणुकीवर नियंत्रण राखण्यासाठी पाच भरारी पथके, दोन चित्रफितीद्वारे (व्हिडिओ) पाहणी करणारी पथके, दोन चित्रफीत सर्वेक्षण पथके व सहा स्थिर पथके कार्यरत असणार आहेत.एकूण ८९ केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी असा फौजफाटा तैनात करणार असल्याचे अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.
मलकापूरला ११ प्रभाग
मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे म्हणाल्या की, मलकापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी मला सहायक म्हणून मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी कपिल जगताप हे आहेत. मलकापूर शहरात १२ हजार ७१२ पुरुष, १२ हजार ४५७ महिला मतदार, तर इतर पाच असे २५ हजार १७४ मतदार आहेत. ११ प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण २२ उमेदवार व नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत. ११ प्रभागांकरिता ३३ मतदान केंद्रे आहेत.
मतदान दोन डिसेंबरला झाल्यानंतर मतमोजणी तीन डिसेंबरला कराडच्या दैत्यनिवारणी मंदिराशेजारील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. मतदान केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे. दिनांक १० ते १७ नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. २५ नोव्हेंबरला अर्ज माघारीची मुदत आहे. उमेदवारांचे अर्ज मलकापूर नगरपरिषद बहुउद्देशीय इमारत सभागृह, लक्ष्मीनगर येथील कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह देणे व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कल्पना ढवळे यांनी सांगितले.
