कराड : पश्चिम घाटक्षेत्रात काही ठिकाणचा अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतली असून, कोयना पाणलोटात तुरळक पाऊस कायम आहे. तर, कोयना धरणातून आवक पाण्यापेक्षा विसर्ग मोठा झाल्याने धरणसाठा घटण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजाला पाणी टेकल्यानंतर त्यातून पहिल्यांदा दीड तर, नंतर तीन फुटांपर्यंत हे दरवाजे उघडून जलविसर्ग सुरु असताना, गेल्या आठवड्यापूर्वीचा तुफान पाऊस अगदीच ओसरत गेल्याने आता धरणसाठा अल्पसा घटतो आहे.

कोयना धरणक्षेत्रात सलग पाचव्या दिवशीही तुरळक पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील जलआवक अगदीच घटली आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद ७,८१४ क्युसेक (घनफूट) पाण्याची आवक तर, ११,४०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा अल्पसा घटतो असून, धरण व्यवस्थापनाकडून जलसाठा नियंत्रण करण्याचे हे धोरण आहे. अनपेक्षित ज्यादाचा जलसाठा आणि पावसाळ्याचा उर्वरित कालावधी विचारात घेवून धरण व्यवस्थापनाने जलसाठा नियंत्रणाचे काटेकोर नियोजन चालवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना पाणलोटात आज सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत केवळ ११.६६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर, कोयना धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांवर कायम ठेवून आवक पाण्यापेक्षा अधिकचा जलविसर्ग सुरु आहे. कोयनेचा धरणसाठा गेल्या २४ तासात ०.०८ टीएमसीने (अब्ज घनफूट) कमी होवून ७६.४४ टीएमसी (धरण क्षमतेच्या ७२.६३ टक्के) राहिला आहे. कोयना पाणलोटात एकूण सरासरी २,४५४.६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ४९.०९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.