भाजपा नेत्या पंकजा मुंडे या दरवर्षी घेत असलेला दसरा मेळावा हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. आज भगवान बाबा की जय अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. बीडमध्ये सावरगावर या ठिकाणी आयोजित दसरा मेळाव्यात त्यांनी जमललेल्या जनसमुदायाला संबोधित केलं. तसंच मी निवडणूक हरले असले तरीही तुमची मान खाली जाईल असं मी कधी वागलेले नाही. राजकारणात जय-पराजय होतच असतात. मी पडले ते झालं आता पाडणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांचा निर्धार बोलून दाखवला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न तुम्हा सगळ्यांसाठी पाहिलं आहे त्यासाठी मी आता मैदानात उतरणार. मी पडले ते झालं.. आता पाडणार आहे. कुणाला पाडणार? जो चारित्र्यहीन असेल आणि पैशांच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार. जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत नसेल त्याला पाडणार. जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून काढणार नाही त्याला पाडणार. जो या महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त मेरीट राहिल. समाजासाठी सेवा करणारं नेतृत्व, चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी मी रात्रीचा दिवस एक करणार. मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल यासाठी मी माझं आयुष्य खर्ची घालणार आहे.” असा निर्धार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला.

जनतेच्या सेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार

तुमच्या सेवेसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार आहे. मी उद्या मरणार आहे का? की आणखी किती वर्षे राहिली आहेत? मला आज माहित नाही. पण मी तुमचा स्वाभिमान मरु देणार नाही कारण मी मैदानात आले आहे. २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देणार. तुमची इच्छा असेल तर मला तिथून कुणीही हटवू शकणार नाही.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका

गोपीनाथ गड तीन महिन्यात मी बनवला पण, आता इतकी वर्षे झाली तरीही सरकारने गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभं केलेलं नाही. मी सरकारला सांगू इच्छिते की आता ते स्मारक बनवूही नका. आता काही तयार करायचं असेल तर शेतकऱ्याचे कष्ट दूर करणारी जादूची कांडी तयार करा. उस तोड कामागारांना न्याय मिळेल असं काहीतरी करा.. गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक हे तेच असेल असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.