लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून देशभर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक घटकपक्ष असल्याने कोणाला संधी द्यायची, यावर युद्धपातळीवर चर्चा सुरू आहे. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महायुतीकडे प्रस्ताव ठेवला आहे. त्यासंदर्भात राज ठाकरेंनी अमित शाहांची भेटही घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही महायुतीत आणखी एक भिडू वाढण्याची शक्यता आहे. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. मनसेच्या अधिकृत खात्यावरून हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर एनडीएमध्ये मनसेही सामील होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, मनसे किंवा राज ठाकरेंकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत जागा मिळणार की नाही, मिळणार असेल तर किती? यावर चर्चा सुरू आहेत.

हसन मुश्रीफ म्हणाले, “राज ठाकरे अमित शहा यांना भेटून आले आहेत. या बैठकीत नेमकं काय ठरलं हे दोन दिवसांत समजेल, देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत याबाबत सांगतील.”

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज रात्रीपर्यंत सुटेल

भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणाला कुठे जागा द्यायची, हे अद्यापही ठरलेलं नाही. हे ठरवण्याकरता सातत्याने बैठका सुरू आहेत. याबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज रात्रीपर्यंत सुटेल. महायुतीच्या केवळ भाजपच्या २० जागा जाहीर झाल्या आहेत. आमच्या तिनही पक्षांची काल बैठक होणार होती. परंतु, ती काल झाली नाही. त्यामुळे आज दिल्लीत बैठक होऊन हा तिढा रात्रीपर्यंत सुटेल. आमची महायुतीची कोणतीही जागा डेंजर झोनमध्ये नाही, त्यामुळे एकच लक्ष आहे ‘अब की बार ४०० पार’, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.