काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही. मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?
भाजपाने यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली. त्यासगळ्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की मी जे बोललो ते २ हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही. अफझलखान १ लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं माळरानावर अफझल खानाशी दोन हात करू नकोस. त्यानंतर विचार करून छत्रपती शिवरायांनी अफझल खानाच्या वकिलाला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण करून पाच जणांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. अफझल खान एवढा मोठा सरदार होता आदिलशाहीतला त्याला धारातिर्थी पाडण्याचा पराक्रम शिवरायांनी केला. त्यामुळे ते अफझल खानापेक्षाही मोठे झाले. शाहिस्तेखान लाल महालात होता पण त्याला कळलं नाही शिवाजी महाराज कधी लाल महालात शिरले आणि बोटं छाटून गेले. औरंगजेब इतकी वर्षे दिल्लीत होता. महाराष्ट्रातली एक इंच जमीन त्याला घेता आली नाही. त्यामुळे महाराज श्रेष्ठ ठरले हेच तर मी बोललो. मी काहीही चुकीचं बोललो नाही.
माझी सामाजिक भूमिका पक्षाला मान्य असेलच असं नाही
तुम्ही अंदमान वीर सावरकरांच्या जीवनातून काढून टाका मला सावरकर समजवून सांगा, नथुऱामच्या आयुष्यातून महात्मा गांधी काढून टाका आणि मला नथुराम समजावून सांगा. हिटलर, मुसोलिनी काढून टाका मला दुसरं महायुद्ध समजावून सांगा असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. माझी भूमिका ही मी सामाजिक भूमिका घेतली आहे. त्याचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडू नका. माझी काही सामाजिक भूमिका असेल तर ती पक्षाची असेलच असं नाही. पक्षाच्या ऐतिहासिक भूमिकेत मतमतांतरं असू शकतात असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत हे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मागच्या सहा महिन्यांपासून भाजपाकडून महापुरुषांची लक्तरं काढली गेली
मागच्या सहा महिन्यांमध्ये भाजपाकडून महापुरुषांची लक्तरं काढली गेली. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या सगळ्यांचा अपमान करण्यात आला. आता यावर आम्हाला आमची भूमिका मांडुद्या ना. मी आज जे बोललो त्यात मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याचा काही प्रश्नच नाही. बोलायला काही नसलं तर भाजपाकडून असे आरोप केले जातात असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मी जे वक्तव्य केलं आहे त्यात काहीही चुकीचं नाही. मी एक इंचही मागे हटणार नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.