राहाता : शेत नांगरताना अचानक ट्रॅक्टरचालकाला समोर पाच फुटांवर बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याही चालकाकडे रोखून पाहत होता. चालकाच्या काळजात धस्स होते आणि बिबट्या पुन्हा आडोशाला जातो. ही थरारक घटना आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर बुधवारी सायंकाळी घडली.न्याय दूध संस्थेच्या लगत साहेबराव दातीर यांच्या शेतात अभिषेक भवर हा तरुण शेतकरी ट्रॅक्टरने शेत नांगरत होता. नांगरलेल्या शेतात बगळे कीटकांना टिपत होते. शेजारीच उसाचे क्षेत्र आहे. अंतर केवळ पाच फुटांचे आहे. या उसाच्या सरीमध्ये बिबट्या बगळ्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता.

अभिषेकचे लक्ष नांगरण्याकडे होते. सहज उसाकडे त्याचे लक्ष गेले, तर बिबट्या समोर उभा होता. दोघांची नजरानजर झाली. बिबट्या तसाच दिमाखात उभा होता. अभिषेकने ट्रॅक्टर थांबवत मोबाइलने बिबट्याचे चित्रीकरण सुरू केले. मात्र, बिबट्या जराही हलला नाही. चित्रीकरणासाठी जणू पोज देत राहिला. चित्रीकरण संपल्यानंतरही बिबट्या तसाच सरीत बसून राहिला. जणूकाही अभिषेकला फोटो काढण्याची संधी देत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. समाजातील काहीजण बिबट्या दिसणे शुभ मानतात. तीच भावना अभिषेक भवर याने व्यक्त केली. सध्या उसाचे क्षेत्र संपले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी घराला कुंपण केले आहे. बिबट्या अन्न व सुरक्षित क्षेत्राच्या शोधात आहे. आश्वी परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे.