कराड: पुणे- बंगळूरू महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रेंगाळले असतानाच ठेकेदार कंपनीसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांनी तीन महिन्याचा पगार व भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी पुन्हा कामबंद आंदोलन छेडले. त्यातून ठेकेदार कंपनीऐवजी वाहनधारक व प्रवाशांचीच अधिक कोंडी झाली आहे.

मुदतवाढही लांबणार

सदर महामार्गाचे सर्व काम हे मुळात वेळेत पूर्ण होवू शकले नसल्याने या कामासाठी ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, तरीही मागेतेच पुढे याप्रमाणे या प्रक्रियेची दशा दिसत आहे. दीर्घकाळ रखडलेले काम, तळपत्या उन्हातील सततची वाहनकोंडी. त्यामुळे कराडजवळ वाहनधारक, प्रवासी व स्थानिकांची हाल सुरु असतानाच आता कामबंद आंदोलनाचे संकट उभे ठाकल्याने सर्वांची पुरती दैना उडाली आहे. एकंदरच प्रकारावरून संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी व ठेकेदार गंभीर नसल्याचे म्हणावे लागत आहे.

प्रवाशांचे हाल वाढणार

कराडजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली जोरदार घोषणा देत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक झालेल्या महामार्ग सहापदरीकरण कामातील कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची शोकांतिका मांडत काम बंद आंदोलन पुकारले आहे. थकीत पगार व भविष्य निर्वाह निधीची रक्कम जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सुमारे १२ किलोमीटर अंतरातील सहापदरीकरणाचे कोणतेही काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे अनेकदा अनेक कारणांनी बंद पडलेले हे काम पुन्हा ठप्प होवून वाहनकोंडी कायम राहिली असल्याने रखरखत्या उन्हाने हैराण वाहनधारक व प्रवाशांचे आणखी हाल होणार आहेत.

वरचेवर आंदोलन

कराडच्या प्रवेशद्वारावर आणि मलकापूर शहराच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यापूर्वी ३२ टन वजनाचा सिमेंटचा मोठा भाग (सेगमेंट) बसवताना क्रेनच्या तांत्रिक बिघाडामुळे तो कोसळून दुर्घटना घडली होती. त्यावेळी दोन कर्मचारीही जखमी झाले होते. यानंतर उर्वरित असे सिमेंटचे मोठे १४ भाग (सेगमेंट) गुणावत्ता तपासणीसाठी परत पाठवले गेले होते. तेंव्हापासून हे काम ठप्प आहे. अशातच आता पगाराअभावी कर्मचारी संपावर गेल्याने महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहनकोंडीत सापडणाऱ्या वाहनधारक, प्रवासी व महामार्गाकडेच्या लोकांच्या हाल अपेष्टांमध्ये कोणतीही कसर राहिली नसल्याचे विदारक चित्र आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत न मिळणे या कारणांमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांत शेकडो कर्मचारी काम सोडून गेले आहेत. उर्वरित कर्मचारी तोंड नाईलाजास्तव काम करत आहेत. बहुतांश कर्मचारी हे परराज्यातील असून, ते दिवसरात्र कष्ट उपसत दिसत असताना पगार व अन्य कारणांसाठी वरचेवर अशी आंदोलने होत आहेत.

साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल रखडला

कराड व मलकापूर शहरांच्या प्रवेशद्वारावरील कोयना नदीवरील पूल व मलकापुरातील सुमारे साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल अशा महत्त्वाच्या कामांसह ठिकठिकाणचे भरावपूल व सहापदरीकरणातील विविध कामे सध्या ठप्प झाली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे महामार्गाच्या सहापदरीकरण काम आणखी रखडणार आहे.

व्यवस्थापकाचा अधिक बोलण्यातस नकार

महामार्ग सहापदरीकरण कामाचे ठेकेदार डी. पी. जैन कंपनीचे व्यवस्थापन संभाळणारे अधिकारी सौरभ घोष यांनी ‘लोकसत्ता’शी आठवड्यापूर्वी बोलताना, कोल्हापूर नाक्यावर काम सुरु असताना अचानक कोसळलेला सिमेंटचा मोठा भाग (सेगमेंट), अलीकडच झालेला तुफान अवकाळी पाऊस आणि उन्हाचा कहर यामुळे येथील उड्डाणपुलाचे वेळेत पूर्ण होणे अवघड असल्याचे स्पष्ट केले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातील माहितीसाठी आज घोष यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नसल्याने नेमकेपणाने सांगू शकत नाही. पण, महाराष्ट्र दिन व कामगार दिनामुळे हे कर्मचारी सुट्टीवर असावेत असे म्हटले आहे.