महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं. एका किमान समान कार्यक्रमावर तीन भिन्न पक्ष एकत्र होते. ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवलं. तोच समन्वय आणि तोच एकोपा विरोधी पक्षात असताना असायला हवा. तरच आपण पुढे जाऊ शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झालाय तो झालाच आहे. त्याकडे महाविकास आघाडी म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे.

मी कुणालाही दोष देत नाही..

मी कुणालाही दोष देत नाही पण सध्या मविआमध्ये समन्वय दिसत नाही.विरोधी पक्षात काम करतानाही समन्वय असला पाहिजे. नागपूर आणि नाशिकच्या जागेसाठी चर्चा व्हायला हवी होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भविष्यात महाविकास आघडीच्या नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत. नाशिकमध्ये जे घडलं त्यासाठी आम्ही दोष देणार नाही. मात्र समन्वय ठेवणं आवश्यक आहे. महाविकास आघाडीत निर्णय घेताना समन्वय ठेवणं आवश्यक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ती चूक सत्यजित तांबे यांचीच आहे

तांबे कुटुंब हे निष्ठावान आहेत. पूर्वापार ते काँग्रेसशीच संबंधित आहेत. मात्र नंतर सत्यजित तांबेंनी काय निर्णय घेतला हे जर आम्हाला माहित नसेल काँग्रेसला माहित नसेल तर काय करता येईल? तांबे कुटुंब आणि गांधी घराण्याचे संबंध चांगले आहेत. सत्यजित तांबे यांनी जी चूक केली आहे ती त्यांची चूक आहे. त्याकडे काँग्रेसची चूक म्हणून पाहता येणार नाही. जे काही नाशिकमध्ये घडलं आहे ते घडायला नको होतं. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

मी जम्मू मध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. मी रोज भारत जोडो यात्रेची माहिती घेतो आहे. त्यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी आत्ता निवडणुकांविषयी बोलणार नाही. पण भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेमुळे जागरुकता निर्माण होते आहे. असंही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडलं नाशिकमध्ये?

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेस पक्ष या मतदारसंघात तोंडघशी पडला. या खेळीमागे देवेंद्र फडणवीस आहेत असंही बोललं जातं आहे. आता संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. विरोधात काम करतानाही तो कायम ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे.