Atharva Sudame : सोशल मीडियावरचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याने एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो आणि त्याला हे समजतं की मूर्तीकार मुस्लिम आहे. मग मूर्तीकार त्याला सांगतो तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची तर घ्या. पण अथर्व सुदामे त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतो. असा या व्हिडीओचा आशय होता. याच व्हिडीओवरुन वाद झाला आहे. ज्यानंतर अथर्व सुदामेने व्हिडीओ डिलिट केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बुक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्यात अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला सांगतो. अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ अथर्वने डिलिट केला आहे.
कोण आहे अथर्व सुदामे?
१) अथर्व सुदामे हा पुणे, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएंसर आणि कॉमेडियन आहे. जो त्यांच्या विनोदी आणि संबंधित मराठी भाषेतील व्हिडिओंसाठी ओळखला जातो. त्याचे इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.
२) अथर्व सुदामे विनोदी रील्स आणि व्हिडिओ तयार करतो. ज्यामध्ये अनेकदा सामाजिक भाष्य आणि दैनंदिन परिस्थितींचा आढावा घेतला जातो. त्याचा कंटेंट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आकर्षित करणारा असतो, प्रशांत दामले, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्याच्याबरोबर रील केले आहेत. जारण चित्रपटाच्या वेळी त्याने केलेलं रीलही चर्चेत आलं होतं.
३) अथर्व सुदामे मोठा चाहता वर्ग आहे. यामध्ये Gen Z पासून अगदी ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचे अनेक व्हिडीओ विनोदी आशय असलेले आणि समाजाला संदेश देणारे असतात.
४) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेच्या कामाचे सार्वजनिकरित्या कौतुक केलं होतं. ज्यानंतर त्याच्या रीलची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. राज ठाकरेंच्या रील स्टार्सचा सन्मान करणारा एक कार्यक्रम केला होता. त्यावेळी सुदामे कुठे आहे असं राज ठाकरेंनी विचारलं होतं आणि तुझे रील चांगले असतात मी पाहतो असं म्हणत कौतुक केलं होतं.
अथर्व सुदामे अलीकडेच (ऑगस्ट २०२५) गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेअर केलेल्या एका रीलमुळे वादात सापडला. या रीलमध्ये तो गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मुस्लिम मूर्तीकाराकडे जातो आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देतो. यामध्ये त्याने म्हटले, “आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही, तसेच वीट व्हावं जी मंदिरातही लावली जाते आणि मशिदीतही.” या रीलवरून हिंदुत्ववादी गट आणि ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला, आणि त्याला धमक्या मिळाल्या. परिणामी, अथर्वने व्हिडिओ डिलीट केला आणि जाहीर माफी मागितली, असे सांगत की कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता असं म्हटलं आहे.
युट्यूब आणि कंटेंट क्रिएटर असलेल्या अथर्व सुदामेचे सोशल मीडिया इन्स्टाग्राम १.५ लाखाबून अधिक फॉलोअर्स आहेत. तर यूट्यूबवर १.१ लाखाहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तसेच ‘निवांत’ नावाचा क्लोथिंग ब्रँड देखील आहे. अथर्व सुदामे लाइव्ह” शो देखील चर्चेत आहे ज्यामध्ये अथर्व, रुचा जोशी आणि आर्यक पाठक यांचा समावेश आहे.