Who is RSS Leader Bhaiyyaji Joshi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक भैय्याजी जोशी यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर भागाची भाषा गुजराती आहे”, असं वक्तव्य जोशी यांनी केलं आहे. त्याचबरोबर “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात”, असंही त्यांनी म्हटलं आहे. जोशी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधक व सामान्य मराठी जनतेकडून टीका सुरू झाली आहे. तर, सत्ताधाऱ्यांनी त्यांचा बचाव करत म्हटलं आहे की जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले असून त्यांच्या वक्तव्याबद्दल गैरसमज झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच मी देखील मराठी भाषिक आहे हे जोशी यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की ते नेमके कोण आहेत? संघात कुठल्या पदावर आहेत. भैय्याजी जोशी उर्फ सुरेश जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत. २००९ ते २०२१ दरम्यान त्यांनी संघाचे सरकार्यवाह (सरचिटणीस) म्हणून कामकाज पाहिलं आहे. सलग चार वेळा त्यांनी हे पद सांभाळलं आहे. संघातील कुठल्याही नेत्याचा हा एक विक्रमच आहे. जोशी हे मूळचे मध्य प्रदेशमधील इंदोरचे आहेत. तिथेच त्यांचा जन्म झाला व बालपण गेलं. लहान वयातच ते संघात दाखल झाले. नंतर ते पूर्णवेळ प्रचारक (पूर्णवेळ स्वयंसेवक) झाले. त्यांनी अनेक वर्षे मजुरांच्या चळवळीत काम केल्याचं सांगितलं जातं.
ते बरीच वर्षे डोंबिवलीत वास्तव्यास होते. येथे वास्तव्यास असताना त्यांनी नोकरी देखील केली. नंतर ते संघाचे प्रचारक (पूर्णवेळ स्वयंसेवक) म्हणून काम पाहू लागले. महाराष्ट्र प्रांतात विविध जिल्ह्यात त्यांनी संघासाठी काम केलं आहे. प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार विभागात वनवासी क्षेत्रात काम केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाह होण्याआधी त्यांनी प्रांत सेवा प्रमुख, अ. भा. सेवा प्रमुख या पदांवर काम केलं आहे.
भाजपाच्या प्रमुख राजकीय निर्णयांमध्ये सल्लागार म्हणून अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका
जोशी यांनी सरकार्यवाह म्हणून संघटनात्मक नियोजन, धोरणात्मक निर्णय, संघाशी संबंधित संघटनांमधील समन्वय साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संघाचे विचार गावागावांत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलं. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यासाठीचं आंदोलन, राम जन्मभूमी आंदोलन आणि इतर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध असून पक्षाच्या प्रमुख राजकीय निर्णयांमध्ये सल्लागार म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते. २०२१ मध्ये सरकार्यवाह पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते संघाचे स्वयंसेवक म्हणून सक्रीय आहेत. संघ परिवारातील एक प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.