Who is Suka Patil : गेल्या काही दिवसांपासन सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे, ते नाव म्हणजे सुखा पाटील. पूर्वीच्या लोकांची जीवनशैली, खाणंपिणं आणि आताच्या लोकांची जीवनशैली यामधील फरक समजावून सांगणारा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये एका आजोबांनी सुखा पाटील नावाच्या एका पैलवानाचं उदाहरण दिलं होतं.

आजोबा म्हणाले, “सुखा पाटील ३० ते ३५ भाकऱ्या खायचा, तो कडब्याच्या एक हजार पेंढ्या बांधायचा, तो पाणी प्यायचा नाही, पाण्याऐवजी केवळ दूध प्यायचा. शरीराने बलदंड होता. खूप कष्ट करायचा. त्यामुळे त्याला भपूर जेवण लागायचं. विहिरीचं पाणी काढायला गेला तर विहिरीतलं पाणी हलवायचा (कमी करायचा), मक्याची ३५ कणसं एकाच वेळी खायचा, तसेच एका वाफेतल्या शेंगा एकटाच खायचा.”

अखेर सुखा पाटील माध्यमांसमोर आले

बजरंग कोळी नावाच्या एका आजोबांनी बंदा रुपया या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवेळी सुखा पाटील यांच्याबद्दल केलेले दावे अनेकांना खोटे वाटू लागले आहेत. त्यामुळे या आजोबांना ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे. कारण सामान्य माणूस इतक्या भाकऱ्या खाऊ शकत नाही किंवा १००० पेंढ्या वाहून नेऊ शकत नाही. तसेच आजोबांनी ज्या व्यक्तीबाबत हे दावे केले आहेत ते सुखा पाटील नेमके कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच हे सुखा पाटील माध्यमांसमोर आले आहेत.

कोण आहेत सुखा पाटील?

बजरंग आजोबांनी दावा केलेले सुखा पाटील म्हणजेच पंढरपूरच्या गादेगावचे सुखदेव पाटील. अनेक हॉटेल चालक सुखा पाटील यांच्या नावाने रील्स बनवून व्हायरल करत आहेत. डोक्यात झालेल्या जखमेमुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला असला तरी त्यांचं आरोग्य ठणठणीत आहे आणि ते अनेकांना प्रेरणा देणारे जीवन जगत आहेत.सुखदेव पाटील हे ८५ वर्षांचे आहेत.

सुखदेव पाटील खरंच ३०-३५ भाकऱ्या खायचे?

सुखदेव पाटील म्हणाले, “मी दिवसातून चार वेळा जेवायचो. एका वेळेला मला आठ ते नऊ भाकऱ्या लागायच्या. अशा मिळून दिवसाला मी ३२ ते ३३ भाकऱ्या खायचो. दूधाशिवाय मी जेवत नव्हतो. हजार पेंढ्या बांधायचो. एकरभर शेताला लागेल इतकं पाणी एकटाच विहिरीतून काढायचो. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून रोज मला अनेक लोक भेटायला येत आहेत. ते पाहून मला भारी वाटतंय.”