सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून कोण बाजी मारणार, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना उद्या शुक्रवारी होणा-या मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. दोन्ही मतदारसंघातील सुमारे २० लाख मते मोजण्यासाठी सुमारे पाच तासांचा अवधी लागणार आहे. दरम्यान, प्रमुख उमेदवारांनी विजयाचे परस्परविरोधी दावे केले असले, तरी प्रत्यक्षात विजय आपल्या बाजूने व्हावा म्हणून सर्वानीच ‘देव पाण्यात’ ठेवले आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यात विलक्षण चुरस असून विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. तर माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांचे कडवे आव्हान राहिल्यामुळे यात कोणाच्या बाजूने निकाल लागणार, हेसुद्धा प्रत्यक्षात मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सोलापुरात १६ तर माढय़ात २४ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मिळून ४० उमेदवारांच्या मतांची मोजणी करण्यासाठी रामवाडी शासकीय धान्य गोदामात होणार आहे. पोलीस बंदोबस्तात होणा-या या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच आदल्या दिवशी, गुरुवारी मतमोजणीच्या प्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली.
एका लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी ५४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघानिहाय १४ टेबलप्रमाणे एकाच वेळी ८४ टेबलवरून लोकसभेची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतांच्या मोजणीने मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून मते मोजण्यासाठी २१ ते २८ फे -या होतील. एका फेरीसाठी साधारणत: १५ ते २० मिनिटांचा अवधी लागणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर व माढा दोन्ही मतदारसंघांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विशेषत: संवेदनशील भागात विशेषत: दक्षता घेतली जाणार असल्याचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांनी सांगितले. अकलूज येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून त्या भागात पोलीस संचलनही केले जात असल्याचे रानडे यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना इकडे सट्टा बाजारात सट्टा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी सोलापुरात सर्व सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस पथके कार्यरत आहेत. परंतु यात सट्टेबाजीचा एकही प्रकार उघडकीला येऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will win in solapur
First published on: 16-05-2014 at 04:30 IST