मंडणगड तालुक्यात खाडी पट्टय़ातील गावांना वादळाचा मोठा फटका बसला असून काही भागात आख्खे गावच वादळाच्या माऱ्याने  कोसळले आहे.

या परिसरात फेरफटका मारला असता काही गावांमध्ये छप्पर असलेले घरच शिल्लक राहिलेले नसल्याचे दिसून आले. जिकडे तिकडे जमिनीवर तुकडे पडलेले. काही ठिकाणी तर सिमेंटच्या पत्र्याचे छप्परच हवेत उडून गेले. किंजळघर, आंबवणे बु , शिगवण ,आंबडवे ,घोसाळे पनदेरी ,उंबरशेत ,पेवेकोंड, वेळास, बाणकोट, वाल्मीकीनगर  इत्यादी गावे शब्दश: उद्ध्वस्त झाली आहेत. सावित्री खाडीच्या टोकाला रत्नागिरी जिल्ह्यातील  शेवटचे गाव आंबवणे (बु.) येथे अद्यापही कोणाचा संपर्क झाला नाही .

मंजन चोरगे , शंकर खेरटकर, निवृत्ती रहाटवळ, दौलत बोथरे , दीपक शिगवण इत्यादी ग्रामस्थांशी संवाद साधला असता, घराचे छप्पर उडाल्यावर क्षणात पायाखालची जमीनच सरकली, असा अनुभव त्यांनी कथन केला. सर्व घरे पत्रेविरहित झालेली. वादळी वारे आणि पावसापासून बचावासाठी लोक पत्रे हातात धरून उभे राहिले.  पण वादळाचा दणका ते रोखू शकले नाहीत.

घरावरचे सर्व छप्पर जाताना स्वत:चा जीव मुठीत घालून लोक निवाऱ्यासाठी धावू लागले. स्लॅब असणाऱ्या घरात निवारा शोधू लागली. लोकांनीही सर्व हेवेदावे सोडून एकमेकांना आपलेसे केले. कुलूप लावलेले दरवाजे कुलूप तोडून , मोडून पडले.

निसर्ग जणू जीवावरच उठला होता . पण माणसे हिमतीने उभी राहिली, असाही अनुभव यावेळी आला. वर्षभर कष्ट करून साठवलेले धान्य वादळामुळे भिजले आहे. तांदूळ भिजून खराब झाला. मातीची घरे वाहून गेली.

चूल पेटवण्यासाठी सरपण नाही, रॉकेल नाही, काही ठिकाणी चूलही जाग्यावर नाही, अशी अवस्था आहे. घरात काही शिल्लक राहिलेले नाही आणि बाहेरून आणण्यासाठी रस्तेही नाहीत. कारण या रस्त्यांवर मोडून पडलेली झाडे तशीच आहेत. वीजेचे खांब , तारा याही जमिनीशी लोळत आहेत. डीपी तर भुईसपाट झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीत आता शासकीय मदतीची वाट न पाहता, तुटलेली कौले, मोडलेले पत्रे जोडून, प्लास्टिक कागद अंथरून निवारा करत आहेत. गुरुवारी दिवसभरात गावातील बऱ्यापैकी घरे डागडुजी करून तयार होऊ लागली होती. तयार झालेल्या  एका घरात ४ ते ५ कुटुंबे एकमेकांच्या आधाराने राहत आहेत.