Ajit Pawar on Parth Pawar Land Deal case: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यानंतर आज अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने महार वतन असलेल्या ४० एकर जमिनीची खरेदी केल्याचे बोलले गेले. या खरेदी व्यवहाराचे कोट्यवधीचे मुद्रांक शुल्कही भरलेले नाही, असा आरोप करण्यात आला. पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांना गुन्ह्यातून वगळण्याचे कारण अजित पवार यांनी सांगितले.

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात आरोपांचे मोहोळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली. कोरेगाव पार्क प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नोंदणी कार्यालयात जी काही नोंदणी झाली होती, तीही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांशी काय बोलणे झाले?

दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांशी कालच संपर्क साधून त्यांना सांगितले की, जरी माझ्या घरातल्या लोकांशी संबंधित हे प्रकरण असले तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावे लागेल, ते करा.

पार्थ पवारांचे गुन्ह्यात नाव का नाही?

अमेडिया कंपनीची ९९ टक्के भागीदारी असूनही पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेले नाही. यावरून विरोधकांनी आरोप केले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर बोलत असताना अजित पवार म्हणाले की, जे लोक व्यवहाराच्या नोंदणीसाठी कार्यालयात आले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अमेडिया कंपनीचे भागीदार कोण?

अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीमध्ये पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील नोंदींनुसार, या कंपनीची आर्थिक खाती अत्यंत अल्प व्यवहार दर्शवितात. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या काळात कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न नोंदवलेले नाही.

आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील या दोन्ही भागधारकांची भांडवलाची एकूण रक्कम २ लाख ५७ हजार ५६८ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवार यांच्या भांडवली खात्यात १.५८ लाख रुपयांची शिल्लक असल्याची नोंद आहे. या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता नसून, एका खासगी बँकेत २ लाख ४७ हजार रुपये आणि १० हजार रुपये रोकड एवढाच निधी असल्याचा तपशील आहे.