लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची गणना नुकतीच पार पडली. यात पहिल्यांदा रानकुत्र्यांचा वावर आढळून आला. रानगव्यांची संख्याही वाढल्याचे दिसून आले. त्यामुळ वन्यजीव अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे. सदाहरित वनांमध्ये या अभयारण्याचा समावेष होतो. १२४ हून अधिक प्रकारच्या वनस्पती या परिसरात आढळतात. गवे, रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हे, बिबटे, शेकरू हे वन्यप्राणी अभयारण्यात नियमित आढळतात. परंतु यंदा प्रथमच रानकुत्र्यांचा वावर यापरिसरात आढळून आला आहे.

आणखी वाचा-यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन

रानकुत्रे हे प्रामुख्याने सह्याद्रीच्या खोऱ्यात दक्षिणेकडील पट्ट्यांमध्ये आढळतात. परंतु फणसाड अभयारण्यात रानकुत्र्यांचा वावर दिसून आल्याने अभयारण्य प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. अभयारण्य क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. यात दोन वेळा रानकुत्र्यांचे छायाचित्र टिपण्यात आले होते. शिवाय पाणवठ्यावर ठसे आढळले आहेत. त्याच प्रमाणे फणसाडमधील मनोऱ्यावरून निरीक्षण करताना दोन रानकुत्रे आढळून आले. एका कॅमेऱ्याने रानकुत्रा टिपता आला, तर दुसरा चाहूल लागल्याने पळून गेल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी दिली आहे.

आता रानकुत्र्यांचा संख्या किती आहे याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी फणसाड अभयारण्यात ठीक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे यांची संख्या वाढवली असून हे पेरणी कॅमेऱ्यात यावेत असा प्रयत्न सुरु केला आहे. अत्यन्त चपळ व वेगवान पळणारे हे प्राणी असून याचा वावर निश्चित कोणत्या ठिकाणी आहे. यांची वस्ती कोणत्या ठिकाणी आहे. याचा शोध घेऊन या प्राण्याचे संवर्धन वृद्धिगत करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अभयारण्यात गव्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. २१ हून अधिक गवे आढळून आले आहेत.