रत्नागिरी : मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे. त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

पोलीस विभागाला प्राप्त १० स्कॉर्पिओ, १४ सी प्रहरी (ई बाईक) तसेच व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, माजी शिक्षण सभापती विलास चाळके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, डीपीसीमधून पोलीस विभागाला लागणारी वाहने रत्नागिरीत सर्वात जास्त डीपीसीमधून आहेत. पोलीसांनी सुखकर आयुष्य जगले पाहिजे. त्यांच्यावरील ताण कमी झाला पाहिजे. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, त्यासाठी १७८ कोटी मधून पोलीस निवास इमारत उभी राहत आहे. समाजाला पोलीसांची आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलीसांनाही जनतेविषयी प्रेम असले पाहिजे, असे ही सामंत म्हणाले. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही लावले जातील. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यावर भर राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार भास्कर जाधव म्हणाले, नागरिकांना त्यांना असणाऱ्या हक्कांची जाणीव झाली आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्ह्याचा शास्त्रशुध्दपणे उकल करावा लागतो. पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही, तर तो ऑनलाईन दाखल केला जातो. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाताना, त्यांच्या वाहनाच्या काचा खाली असल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.