ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. हिवाळी अधिवेशनादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलू दिलं नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यानंतर विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलगीरी पत्र सादर करण्यासाठी अंधारे यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणताही गुन्हा केला नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिली. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींना संस्कृत भाषेतून पत्र लिहीत तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

संबंधित विधानावर स्पष्टीकरण देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जितक्या अनावधानाने आणि नकळतपणे ‘पीएचडी करून काय दिवे लावायचे आहेत का?’ म्हटलं होतं. तितक्याच अनावधानाने मी रवींद्र धंगेकरांना नीलम गोऱ्हेंनी का बोलू दिलं नाही, असं म्हटलं. कदाचित नीलम गोऱ्हे आमच्याकडे २५ वर्षे राहिल्या आहेत. त्यांनी पाच वेळा आमच्या पक्षाची आमदारकी भोगली आहे. त्यामुळे जुना ऋणानुबंध असू शकतो. पण त्याला गुन्हा ठरवून निव्वळ राजकीय कुरघोडी करायची म्हणून जर माझ्यावर हक्कभंग आणला जात असेल तर मी माफी मागणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will go to jail but not apologise sushma andhare letter neelam gorhe and ravindra dhangekar statement rmm
First published on: 23-12-2023 at 16:30 IST