जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे अजित पवार हे भाजपासह जात सत्तेत सहभागी झाले. ते एकटेच गेले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदार बरोबर घेऊन गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष निर्माण झाला. अजित पवार यांनी ५ जुलैला जी सभा घेतली त्या सभेतही शरद पवारांच्या वयाच्या मुद्दा उपस्थित केला होता. तसंच लोकसभा निवडणूक प्रचारातही शरद पवारांच्या वयाचा मुद्दा आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र यावरुन अजित पवारांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

अजित पवारांनी काय म्हटलं होतं?

आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला होता.

हे पण वाचा- शिंदे गट अन् अजित पवार गटात जुंपली; बारणेंच्या आरोपाला सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “अपयश लपवण्यासाठी…”

लोकसभेच्या प्रचारात इंदापूरमध्ये अजित पवार काय म्हणाले होते?

“हर्षवर्धन पाटील आणि मी विकासासाठी एकत्र आलो. तुम्ही आमच्यातले आरोप-प्रत्यारोप पाहिले आहेत. मात्र आपला देश महासत्ता व्हावा, सर्व जाती-धर्माचे लोक वंचित राहू नये ही आमची भूमिका आहे.” “काही जण म्हणतात या वयात दादांनी साहेबाला सोडायला नको होतं पारावर अशी चर्चा करतात. मित्रांनो मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब (शरद पवार) म्हणतील ती पूर्व दिशा. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. लहान असताना आजी आजोबांनी सांगितलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गी वसंत दादा पवार हे पोटनिवडणुकीला उभे होते. त्यावेळी शरद पवार हे महाविद्यालयात होते. त्यावेळी शरद पवारांनी आमच्या थोरल्या काकांना विरोध केला. अख्खं पवार कुटुंब शेकापच्या बाजूने होतं. त्यावेळी शरद पवारांनी विरोधी काम केलं. ही सुरुवात झाली. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार उभे राहिले. प्रत्येकाला संधी मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही नंतर संधी मिळाली. शरद पवारांनी मला संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी निवडणुकीची संधी दिली होती. असं अजित पवार म्हणाले होते.

हे पण वाचा- जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका, “राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट जवळ, आग लावण्याची कामं..”

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

वय होणे हा फक्त अंकांचा खेळ आहे हे आदरणीय शरद पवार साहेब हे त्याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे. गेले सहा महिने त्यांच्याच सोबतचे लोक, साहेबांनीच मोठी केलेले माणसेच साहेबांच्या वयाबाबत बोलत होते. “आता तरी घरी बसायला हवे, आता तरी निवृत्त व्हायला हवे”, असे उघडपणे म्हणताना दिसत होते. काल महाराष्ट्रातील निवडणूक संपली. सांगा बरं, आदरणीय पवारसाहेब यांच्याइतके कोणता नेता फिरला. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाला स्पर्श करणारा इतर कोणता नेता होता? एवढ्या उन्हात छोट्या छोट्या गावांत बैठका घेणारा कुठला दुसरा नेता होता? प्रबळ इच्छाशक्ती हीच आदरणीय शरद पवार साहेब यांची ताकद आहे. अन्, त्यांच्या पक्षातील विरोधकांनाच ती समजली नाही. बाहेरच्यांना समजली नाही ती वेगळी गोष्ट आहे; पण, त्यांच्यासोबत ३०-३० वर्षे राहून समजली नाही, याचे आश्चर्य वाटते. साहेबांकडून काय घ्यावे, असे जर कोणी मला विचारले तर ‘प्रबळ इच्छाशक्ती’ आपण घेतली पाहिजे, असे मी म्हणेन. अवघड प्रसंगामध्ये उभे कसे रहायचे, हे आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडून शिकावे.

ही पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आता याबाबत अजित पवारांकडून किंवा अजित पवार गटाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.