हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचा औरंगाबाद शहरात पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे केली. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथील पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री चव्हाण यांनी मराठवाडा विभागातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिक संघटनांचे पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. 
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांनी तसेच त्यांच्या पाल्यांनी विविध समस्या मांडल्या व त्यासंदर्भात निवेदनही सादर केले.स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनातील/सन्मान वेतनातील तफावत दूर करावी, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यासाठीची प्रकिया अधिक सुलभ करावी, पाल्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण द्यावे, गृहनिर्माण संस्थांसाठी जागा देण्यात याव्यात आदी मागंण्याचा निवेदनात समावेश होता.
यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी औरंगाबादेत स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारला जाणे आवश्यक असून, आपण याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमू, असे जाहीर केले. ही समिती पुतळयाची जागा आणि अनुषंगिक बाबी संदर्भात निर्णय घेईल. या पुतळयाची उभारणी शासकीय तरतुदीतून अथवा गरज पडली तर मुख्यमंत्री निधीतून केली जाईल, असेही ते म्हणाले.