सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही, याबाबत संभ्रम आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाचं मत मांडलं आहे.

“माझ्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. जर एकत्र निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीकोनातून चांगलं राहील. पण याबाबत आमचा निर्णय झालेला नाही.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. “आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. एकमेकांची मतं जाणून घेतल्यानंतर जाहीरपणे बोललेलं बरं.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा अवधी लागेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टानं नेमकं काय सांगितलं आहे, याबाबतही पत्रकार परिषदेत सांगितलं. “कोर्टानं असं सांगितलं आहे की, जी निवडणूक थांबवली होती. ज्या टप्प्यात थांबवली होती, तिथून सुरु करा. काही ठिकाणी याद्या तयार नाही. काही ठिकाणी हरकती मागवायच्या आहेत. हरकती मागितल्यावर एक महिना जातो. त्यानंतर वॉर्डरचना होते. त्याला एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर महिला, मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना जातो. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी अडीच ते तीन महिने लागणारच. त्यामुळे १५ दिवसात निवडणुका जाहीर करणं शक्य नाही. त्यामुळे १५ दिवसांत प्रक्रिया सुरु करा, असा आदेश आहे.”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. “ज्या ठिकाणी आरक्षित जागा होती, तिथे आरक्षित वर्गाच उमेदवार देणार, असं मी पक्ष बैठकीत सांगितलं आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.