शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. मनसे नेते राज ठाकरे हेही उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करत आहेत. दुसरीकडे, राज ठाकरे यांचे भाजपा आणि शिंदे गटाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं चित्र दिसत आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना पर्याय ठरू शकतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी ठरवलं तर ते राज्याचे नेतेही होऊ शकतात, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पर्याय असू शकतात का? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यांनी (राज ठाकरे) विचार केला तर ते राज्याचे नेतेही होऊ शकतात.” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मनभेद झाले आहेत, पण राज ठाकरेंशी मनजुळणी सुरू आहे का? असं विचारलं असता बावनकुळे पुढे म्हणाले, “राज ठाकरे हे मनाने दिलदार आहेत. मनुष्य म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून ते दिलदार मनाचे आहेत. त्यांचं मन छोटं किंवा किंचित नाही. त्यांचं मन मोठं आहे. मोठ्या मनाची माणसं कधीही मनभेद होऊ देत नाहीत. किंचित मनाची माणसं मनभेद होऊ देतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे. उद्धव ठाकरे छोट्या मनाचे आहेत. राज ठाकरे मोठ्या मनाचे आहेत. राज ठाकरेंची मैत्री ही खूप चांगली आहे. राजकारणाच्या दृष्टीने मैत्री करण्यासाठी मी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही किंवा तेही कधी माझ्याकडे आले नाहीत. पण आम्ही दोघंही एकमेकांच्या घरी अनेकदा गेलो आहोत. आम्ही कधीही राजकारणावर बोलत नाहीत.”
हेही-“…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकी
निवडणुकांमध्ये मनसेला गरज लागली तर त्यांच्या पाठीशी महाशक्ती उभी कराल का? असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, “आज अशी काही चर्चा नाही. त्यामुळे यावर आज बोलून काही उपयोग नाही. राजकारणात उद्या काय होईल? हे मलाही माहीत नाही. पण आज तरी तशी परिस्थिती नाही. पण राज ठाकरेंशी आमची चांगली मैत्री आहे.”