दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालं होतं. परंतु, अचानक बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, मी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय होणार असल्याचं त्यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने त्यांची आता पुढची दिशा काय असणार याबाबत त्यांनी संवाद साधला आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

ज्योती मेटे यांनी बीड दौरा केला. या दौऱ्यात त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. याबाबत त्या म्हणाल्या, जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून भारावून गेले आहे. यामुळे जबाबदारीचं ओझं दुप्पट वाढलं आहे. छत्रपती संभाजी नगरहून येथे येण्यास सुरुवात केली. काफिला बनता गेला, तसं एक एक अॅड होत गेला.

महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे पुढचा निर्णय काय घेणार याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “सहसंमतीने आणि पूण विचारांअंतीच निर्णय घेतला जाईल. बीडमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान असल्याने वेळ भरपूर आहे. ही वेळ विचारात घेऊन पुढची पावलं निश्चित उचलू.”

हेही वाचा >> ठाण्यात महायुतीतील तिढा संपला? दीपक केसरकरांचं सूचक विधान, म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात…”

जिंकण्याच्याच मानसिकतेत निवडणूक लढवणार

तसंच, बीडमध्ये तिहेरी लढत रंगण्याची शक्यता आहे. महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे अशी उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्यामुळे ज्योती मेटे यांनीही निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यास येथे तिहेरी लढत होईल. या लढतीत काय आव्हान वाटतं, याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, “एकदा शर्यतीत उतरल्यानंतर जिंकण्यासाठीच उतरलं पाहिजे या मानसकितेची मी आहे.”

लोकसभा निवडणुकीत उतरण्याकरता ज्योती मेटे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. निवडणुका लागल्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ज्योती मेटेंचं नाव इच्छुक उमेदवारांच्या यादीत पहिलं होतं. त्यांनाच बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळून पंकजा मुंडेंविरोधात त्या लढतील असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु, शरद पवार गटाने आयत्यावेळेला डाव उलटला आणि संजय सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. सध्याच्या घडीला संजय सोनवणे आणि पंकजा मुंडे अशी दुहेरी लढत रंगताना दिसतेय, पण आगामी काळात ज्योती मेटे यांनीही उमेदवारी अर्ज भरला तर येथे तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.