वांग्याचे भरीत, कळणाची भाकरी अन् झणझणीत ठेचा हा अस्सल खान्देशी बेत. खान्देशी वांग्याची चवही अप्रतिम असते. नागपूरच्या थंडीत अधिवेशनात गोंधळ व आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले असले तरी जेवणाचे खास बेतही रंगत आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे जळगावचे. त्यांचे पत्रकारांशी मत्रीचे संबंध आणि आदरातिथ्य हे त्यांचे वैशिष्टय़. त्यामुळे खान्देशी वांग्याचे भरीत, भाकरी अन् ठेच्याचा खास घरगुती बेत महाजन यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकारांसाठी ठेवला. त्यासाठी जळगावमध्ये भरतासाठी खासीयत असलेले गणेश भरीत सेंटरचे पंकज पाटील यांना पाचारण केले होते. चुलीवर खास भाजलेली वांगी, दगडीमध्ये खलून, कालवून त्यात कांद्याची पात, कोिथबीर, हिरवी मिरचीचा ठेचा, तळलेले शेंगदाणे घातल्यावर लसणाची खमंग फोडणी, ही खान्देशी भरताची खास रेसिपी. जोडीला लवंगी मिरचीचा झणझणीत ठेचा, सणसणती तिखट शेवभाजी आणि भाकरी हा ठसका लागणारा अप्रतिम बेत. मग काय सर्वानीच अधिवेशनाच्या धावपळीतही त्यावर आडवा हात मारला.
पंकज पाटील यांच्या भरीताची जळगाव परिसरातच नाही, तर अन्यत्रही बरीच प्रसिद्धी झाली आहे. अगदी इंदूर व अहमदाबादपर्यंतही ते खासगी बसगाडय़ांमधून ऑर्डरनुसार पार्सल पाठवितात व मोठी ऑर्डर असल्यास स्वत: तेथे जाऊन बेत जमवितात. जळगावची वांगी चुलीवर भाजून अस्सल गावरान पद्धतीने केलेल्या भरताची लज्जतच न्यारी. पंकज पाटील हे भरताचे ब्रॅिण्डग करीत असून हा पदार्थ अधिकाधिक लोकप्रिय व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. वांगे म्हटल्यावर तसे काही जण नाके मुरडतात. पण खान्देशी रेसिपीनंतर त्याची लज्जत हीच खासीयत झाली असून नागपुरात पुढील काही दिवसांत भर थंडीत भरीत-भाकरीचे बेत रंगणार आहेत, हे मात्र नक्कीच
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
अधिवेशनातून, खान्देशी वांग्याचे भरीत अन् कळणाची भाकरी
वांग्याचे भरीत, कळणाची भाकरी अन् झणझणीत ठेचा हा अस्सल खान्देशी बेत
Written by रत्नाकर पवार

First published on: 11-12-2015 at 06:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter session in nagpur