सांगली : मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून झालेल्या अर्भक चोरीप्रकरणी चौकशी समितीने पाच सुरक्षारक्षकांवर ठपका ठेवला आहे. डॉ. प्रियंका राठी यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला असून, यावर अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव पुढील निर्णय घेणार आहेत.दि. ३ मे रोजी रुग्णालयाच्या प्रसूतिकक्षातून तीन दिवसांच्या बाळाची एका महिलेने चोरी केली होती. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरी करणाऱ्या सारा साठे या महिलेला अटक करून अपहृत बाळ मातेच्या स्वाधीन केले.

बाळ चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने डॉ. राठी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने मंगळवारी आपला चौकशी अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांना सादर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसूतिकक्षावर नियुक्त असलेल्या महिला रक्षकासह मुख्य प्रवेशदारावर नियुक्त असलेल्या रक्षकांनी सुरक्षा राखण्यात आणि बाळ चोरी होण्यात हलगर्जीपणा दर्शवल्याचा आरोप समितीने अहवालात नमूद केला आहे. मात्र, रुग्णालयातील प्रसूतिकक्षात असलेल्या परिचारिकांवर कोणताही दोषारोप ठेवला नसल्याची माहिती मिळाली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गुरव रजेवर असून, शुक्रवारी हजर होणार आहेत. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच या चौकशी अहवालावर कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.