सातारा: पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने साताऱ्यात चार अपत्यांना जन्म दिला आहे. या दाम्पत्यास अगोदर तीन अपत्ये आहेत. संबंधित महिला गृहिणी आहे तर तिचा पती मजुरी काम करतो.
मूळचे गुजरातचे असलेले विकास खाकुडीया आणि त्यांची पत्नी हे मागील ३० वर्षांपासून सासवड (जि. पुणे) येथे राहतात. त्यांना पाच वर्षांची दोन आणि तीन वर्षांचे एक अपत्य आहे. या तीन मुलांच्या पाठीही त्यांची पत्नी चौथ्यांदा गरोदर राहिली होती. या वेळी तपासणीत त्यांना तिळे असल्याचे सांगण्यात आले होते. अगोदर तीन अपत्ये असल्यामुळे या अपत्यांबाबत डॉक्टरांनी त्यांना पूर्वकल्पना दिली. मात्र या दाम्पत्याने या मुलांसाठी आग्रह धरला.
संबंधित महिला प्रसूतीसाठी साताऱ्यातील तिच्या नातेवाइकांकडे आली होती. प्रसूतीसाठी तिला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी केलेल्या तपासणीत आईच्या पोटात तब्बल चार बाळे असल्याचे लक्षात आले. अशा वेळी अतिशय काळजीपूर्वक या चारही बाळांची प्रसूती करण्यात आली. या चार अपत्यांमध्ये एक मुलगा आणि तीन मुली आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मेजर डॉ. राहुलदेव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सदाशिव देसाई, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार मसराम यांच्यासह डॉ. नीलम कदम, डॉ. दिपाली राठोड पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. आई आणि ही चारही अपत्ये सुखरूप आहेत, अशी माहिती डॉ. करपे यांनी दिली.
दरम्यान विकास खाकुडीया हे मिळेल तिथे मजुरीचे काम करतात. त्यातून ते तीन मुलांसह आपला संसार चालवत आहेत. यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. यातील दोन अपत्ये ही पाच वर्षांची तर एक अपत्य तीन वर्षाचे आहे. आता त्यांच्या कुटुंबात पुन्हा नवी चार अपत्ये दाखल झाली आहेत. या बेताच्या आर्थिक परिस्थितीत या मोठ्या कुटुंबांचा खर्च कसा भागवणार असे विचारले असता विकास खाकुडीया यांनी ही मुले आम्हाला हवी होती. मजुरी करून त्यांचा खर्च भागवेल असे ते म्हणाले.
सुखरूप प्रसूतीचे समाधान
या महिलेच्या तपासणीनंतर महिलेच्या गर्भात एकाच वेळी चार अपत्ये असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने अतिशय काळजी घेतली, तिच्याकडे विशेष लक्ष पुरविले. वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांनी घेतलेल्या काळजीमुळे या महिलेने चार गोंडस मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये तीन मुली तर एक मुलगा आहे. महिलेची सुखरूप प्रसूती होणे हे आमच्यासाठी प्राध्यान्यक्रम आव्हान होते. ते पार पडल्याने समाधान वाटत आहे. काही व्यक्ती-कुटुंबांमधील जनुकीय रचनेतून अशी जुळी किंवा त्याहून जास्त संख्येने मुले जन्माला येतात. या कुटुंबीयांची अधिक माहिती घेतली असता यापूर्वीही त्यांच्या घरात जुळी जन्माला आलेली असल्याचे डॉ. करपे यांनी सांगितले.