सांगली : नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत नोएडाच्या एका महिलेने मिरजेतील पायलटला ५८ लाख ९२ हजार रुपयांना (९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर) गंडा घातला. पैसे परत मागितले असता आईकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आतिष शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हना खान हिच्याशी परिचय झाला. “माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मी पतीशी घटस्फोट घेऊन लग्न करेन, पण मला पायलट व्हायचं आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे,” असं म्हणत आरोपी महिलेने पायलट आतिष शिंगे यांच्याकडे पैशांची मागणी केली. दरम्यानच्या काळात महिलेने पायलट होण्यासाठी शिंगे यांच्याकडून ५८ लाख ९२ हजार रुपये (९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर) घेतले.

मुंबई, मिरज व मंगळुरु अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम घेतली. यावेळी आरोपी महिलेने रकमेची परतफेड पायलट झाल्यावर करते असं सांगितलं. मात्र, पैसे परत मिळत नाहीत व लग्नही करत नाही असे लक्षात येताच शिंगे यांनी पैशाची मागणी केली. ही महिला गेली सहा वर्षे शिंगे यांच्या संपर्कात होती.

यावेळी जमिनीची विक्री करून देते, अथवा जमीन नावे करुन देते असं सांगत आरोपी महिलेने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सातत्याने पैशाची मागणी करताना वडिलांचे १२ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे. ते आल्यावर देते असे सांगून वारंवार फसवणूक करण्यात आली.

हेही वाचा : खोदकामातील सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यात कापड व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैशांबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगताच आरोपी महिलेने आईमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.