सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे, मात्र लोकप्रतिनिधींच्या कथित दुर्लक्षामुळे हे काम रखडले असल्याचे चित्र आहे. सध्या सावंतवाडी येथे भाडेतत्त्वावर सुरू असलेले मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग उपपरिसर केंद्र कायमस्वरूपी जागेच्या प्रतीक्षेत आहे.
उपपरिसर केंद्राच्या जागेचा गुंता;
सुरुवातीला झाराप (ता. कुडाळ) येथे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची आवश्यकता असल्याने झाराप येथील जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे नाव सातबारावरून काढून टाकण्यात आले. विशेष म्हणजे, सध्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत असतानाही झाराप येथील जमीन अजूनही वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे.
या घटनेनंतर, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आंबोली येथे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबोली येथे उपकेंद्र होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही ही जमीन विद्यापीठाच्या ताब्यात न आल्याने उपकेंद्राचे काम पुढे सरकले नाही. मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग उपपरिसर केंद्र संचालक श्रीपाद वेलिंग यांनी या जागेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे. मुंबई विद्यापीठाचे मुख्य केंद्र लांब असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोयीचे होण्यासाठी या उपकेंद्राची नितांत गरज आहे.
वेंगुर्ल्यात सागरी संशोधन मॉडेल कॉलेजची आशा:
एकीकडे उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित असताना, दुसरीकडे वेंगुर्ले येथे सागरी संशोधन मॉडेल कॉलेजच्या कामाला गती मिळाली आहे. कोकणाला लाभलेल्या अथांग सागरकिनाऱ्यामुळे सागरी संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी मुंबई विद्यापीठाला वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मदतीने चार एकर जमीन उपलब्ध झाली आहे. २०२२ मध्ये वेंगुर्ले येथे सागरी संशोधन मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असून, इमारतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे संचालक श्रीपाद वेलिंग यांनी सांगितले. या ठिकाणी सागरी संशोधनाचे मॉडेल कॉलेज साकार होणार असल्याने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी संशोधन केंद्राचे मॉडेल कॉलेज आणि मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र अशी दोन्ही महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे होण्याची शक्यता असताना, केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उपकेंद्राचा प्रश्न खोळंबून राहिल्याचे चित्र आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्याची मागणी आता शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे असे विद्यार्थी, महाविद्यालयांतील प्राध्यापकांना वाटते.