अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.


एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी आता ११ कमांडो तैनात असणार आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेश आहे. हे सुरक्षा पथक २४ तास खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत राहणार आहेत.


प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. पण आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. परिस्थितीनुसार, सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडून व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दर्जामध्ये बदल केला जातो. मध्यंतरी शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.