वनसंपदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिका-यांच्या शासकीय निवासस्थानातीलच वनसंपदा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. एका चोरट्याने चक्क उपवनसंरक्षकांच्या शासकीय बंगल्यातून चंदनाचे झाड चोरून नेत वनविभागाला आव्हान दिले. या घटनेने वनविभागाच्या कार्यशैलीची लक्तरे वेशीवर टांगली असून, घरातील झाड सुरक्षित न ठेवू शकणारे अधिकारी जंगल सुरक्षित राखतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.

झाडाच्या बाजूनेच ताराचे कुंपण तोडल्याचेही आढळून आले –

येथील वैद्यकीय महाविद्यालय मार्गावर उपवनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानी २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. या बंगल्याचे संरक्षण आणि देखभालीसाठी गजानन घाटारे रात्रपाळीत सेवेत असतात. ते दररोज रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत कर्तव्य बजावतात. शुक्रवारी ते बंगल्याच्या आवारात फेरफटका मारत असताना चंदनाचे एक झाड तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या झाडाच्या बाजूनेच ताराचे कुंपण तोडल्याचेही आढळून आले. त्यांनी याबाबत उपवनसंरक्षकांना माहिती दिली. तेव्हा बंगल्यातील सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्याने चंदनाचे झाड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

कधीकाळी यवतमाळ शहरालगत उमर्डा नर्सरीत असंख्य चंदनाची झाडे होती –

या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने वनविभागावर नामुष्कीची वेळ आली आहे. कधीकाळी यवतमाळ शहरालगत उमर्डा नर्सरीत असंख्य चंदनाची झाडे होती. मात्र, वन विभागाच्या अशाच बेसावध सुरक्षा व्यवस्थेमुळे आज या जंगलात चंदनाचे झाड नावालाही उरले नाही.