सांगली : चारा-पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या सांबराला कुंडल येथील तरुणांनी वन विभागाच्या मदतीने जीवदान दिले. कुंडल येथे बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या स्वामी मळ्यातील विहिरीत सांबर पडल्याचे रविवारी दुपारी काही तरुणांना दिसले. विहिरीला पायऱ्याच नसल्याने विहिरीबाहेर पडण्याचे त्याचे प्रयत्न तोकडे ठरत होते. ही बाब तरुणांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली.

कडेगाव-पलूसचे वनक्षेत्रपाल संतोष शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांचे बचाव पथक घटनास्थळी आले. रविवारी रात्री उशिरा बचाव पथकाने दोरीच्या मदतीने सांबराला विहिरीबाहेर काढले.

वनक्षेत्रपाल शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी सुरेखा लोहार, गणेश कांबळे, नितीन पवार, वन्यजीव विभागाचे कुरेश मुजावर, अक्षय पवार, तन्मय कांबळे, कृष्णा वड्ड, तेजस फासे, सूरज निवळे, सिध्देश टकले, संतोष जंगम, गोपी जंगम आदींच्या पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने या सांबराला विहिरीबाहेर काढून वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.