सांगली : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र बुधवारी दिनांक ७ मे रोजी ही सावली आपली साथ सोडणार आहे. या दिवशीच दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याची म्हणजे शून्य सावलीचा अनुभव सांगलीतील नागरिकांना घेता येणार असल्याचे डॉ. संतोष माने यांनी सांगितले.
निसर्गातील भौगोलिक घडामोडींमुळे सावलीही आपली पाठ सोडणार असल्याचा वैज्ञानिक अनुभव नागरिकांना सांगली जिल्ह्यात बुधवारी ७ मे पासून शुक्रवारी ९ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी मध्यान्ही म्हणजे ठीक १२ वाजून २८ मिनिटांनी ५२ सेकंदासाठी घेता येणार असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
पृथ्वी स्वत:भोवती परिभ्रमण करत असताना ती सूर्याभोवतीही फिरते. परंतु पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून, तो २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळेंच पृथ्वी परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडे असतो.
एखाद्या अक्षांशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये असणार्या सर्व भूभागावर उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या खाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, असे डॉ. माने यांनी सांगितले. माणसाची सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते.
शून्य सावली दिवस निश्चित करण्यासाठी विविध खगोलीय गणित जुळवून त्या तारखा ठरविल्या जातात . शून्य सावली दिवसाचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला ३ मे ते ३१ मे या कालावधीत घेता येणार आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील सांगली सह मिरज, वाळवा, तासगाव,कवठेमहांकाळ, शिराळा येथे ७ मे रोजी तर ८ मे रोजी जत,पलूस, खानापूर, कडेगाव व ९ मे रोजी आटपाडी येथे शून्य सावली दिवस अनुभवायला मिळणार आहे