‘निदान’ या चित्रपटाची कथा ब्लड ट्रान्स्फ्युजनमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या मुलीभोवती फिरते. ‘आई’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाच महेश मांजरेकरला हा विषय सुचला. पहिलाच हिंदी चित्रपट- आणि तोही अशा अनवट विषयावर! महेशला अनेक लोकांनी सावध केलं. पण ज्या गोष्टीकडे इतर लोक ‘संकट’ म्हणून बघतात, त्याच गोष्टीकडे हा अजब इसम ‘संधी’ म्हणून बघत असतो! महेशच्या या जोखीम पत्करायच्या स्वभावाचा त्याला बऱ्याचदा फायदा झाला आहे. आणि अनेक वेळा तोटाही. पण फायदा-तोटा फक्त पैशात न मोजणारा हा भिडू कायम स्वत:च्या हिमतीवर लढत आलेला आहे. महेशच्या डोक्यात कथेबरोबरच कास्टिंगही झालं होतं. आई-वडिलांच्या भूमिकेत अनुक्रमे रीमा आणि महेशचा ‘लकी मॅस्कॉट’ शिवाजी साटम, एच.आय.व्ही. बाधित मुलीच्या भूमिकेत निशा बेन्स ही नवीन मुलगी, आणि तिच्या बॉयफ्रेंड/नवऱ्याची भूमिका करण्यासाठी आमचा मित्र सुनील बर्वे. अर्थात बव्र्यानी अभिनयाबरोबरच चेन्नईला रेकॉर्डिगच्या वेळेस प्रॉडक्शन मॅनेजरची भूमिकाही उत्तम वठवल्याचं मला लख्ख आठवतं आहे! ‘कमी तिथे आम्ही’ हे महेशच्या युनिटमधल्या प्रत्येकाचं ब्रीदवाक्यच आहे!
महेशने ‘निदान’मध्ये संजय दत्तचा स्पेशल अपिअरन्स असलेले दोन सीन लिहिले होते. हॉस्पिटलमध्ये मृत्युशय्येवर असताना संजय दत्तची डाय-हार्ड फॅन असणारी निशा आपल्या वडिलांकडे संजूबाबाला भेटायची इच्छा व्यक्त करते. आपल्या लाडक्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा बाप संजय दत्तच्या अनेक सेट्सवर जाऊन त्याला भेटायचा प्रयत्न करतो, मार खातो आणि अथक परिश्रमांनंतर शेवटी संजय दत्त निशाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटतो- असे ते सीन. संजय दत्त तेव्हा फॉर्मात होता. ज्याने मराठीत एकच चित्रपट केला आहे अशा नवख्या निर्माता-दिग्दर्शकाला हिंदीतल्या एका बडय़ा स्टारने का भेटावं? (वीस वर्षांपूर्वी हिंदी स्टार्स मराठीला नाकं मुरडायचे. आज तेच स्वत: मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहेत!) संजूबाबाला आम्ही जंग जंग पछाडलं. पण तो काही हाती लागेना. त्याला नुसतं भेटायची मारामार. ‘निदान’मध्ये काम करेल की नाही, हा मुद्दा पुढचाच होता. शूटिंगचे दिवस संपत आले. शेवटी कंटाळून आम्ही महेशला वेगळा कोणीतरी नट घेऊ या, असंही सुचवून पाहिलं. पण दुसऱ्याचं सहजासहजी ऐकेल तर तो आमचा ‘मांज्या’ कसला? त्याला मागे ओढण्याच्या नादात त्याच्या धारेनं तुमचंच बोट कापलं जायचं! काहीही झालं तरी त्याला ‘निदान’मध्ये संजय दत्तच हवा होता. (कदाचित त्याच्या डोक्यात तेव्हाच ‘वास्तव’ची जुळवाजुळव चालू झाली असावी.) दत्तसाहेबांनी होकार द्यायच्या आधीच आम्ही ‘मेरे संजू को पेहचानो तुम..’ असं एक गाणं रेकॉर्ड करून मोकळेही झालो होतो. पण हा बाबा काही भेटेना! सिनेमातल्या संजूबाबाला भेटण्यासाठी हवालदिल झालेल्या बापासारखीच आमची अवस्था झाली होती! पण महेश मोठा चिवट! वेताळ पंचविशीतल्या विक्रमासारखा तो संजय दत्तच्या मागे लागून त्याला भेटला आणि दोन सीन करण्याकरिता त्याला पटवलाही. ‘निदान’च्या शूटिंगच्या दरम्यान त्याने संजूला ‘वास्तव’ ऐकवला. अ‍ॅन्ड द रेस्ट इज हिस्ट्री!
‘निदान’मध्ये लहान-मोठी मिळून एकंदर नऊ गाणी होती. आमची गाण्याची सीटिंग्ज महेशच्या चुनाभट्टीच्या घरी होत. महेशच्या आईच्या- माईच्या हातचे चविष्ट, अत्यंत प्रेमाने वाढलेले मासे खाणे हाच खरं म्हणजे त्याच्या घरी सीटिंग, मीटिंग करायचा आमचा सुप्त उद्देश असायचा! माई आणि दीपा ‘जेवणार का?’ असा मोघम प्रश्न न विचारता सरळ ताटच मांडत असत! विविध प्रकारच्या मत्स्यांची कायम रेलचेल असायची मांजरेकरांकडे. मग भरल्या पोटी भजन रंगणारच!
महेशला संगीताची बऱ्यापैकी जाण आहे. तो गातोही सुरात. शिवाय ‘माझी बॅट, मी कॅप्टन’ अशी त्याची वृत्ती गाण्यांच्या बाबतीत तरी नसते. गाणं करताना तो संगीतकाराला हवी ती मुभा देतो. पाश्र्वसंगीताच्या बाबतीत मात्र बॅट आपलीच आहे याची त्याला प्रकर्षांने जाणीव होते. ‘निदान’ची गाणी चेन्नईच्या स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रित करावी असं माझं मत होतं. याचं मूळ कारण तिथे मिळणारा उत्तम साऊंड. मुंबईत रेकॉर्डिग करण्यापेक्षा ते निश्चित महाग होतं. त्याकाळचे मोठमोठे निर्मातेदेखील गाण्यांवर एवढा खर्च करत नसत. पण रिस्क घेणे हा महेशचा स्थायीभाव आहे. त्याने कुठलेही आढेवेढे न घेता माझ्या या खर्चीक उपक्रमाला मान्यता दिली. संगीत संयोजक पीयूष कनोजिया, तौफिक कुरेशी आणि सलीम र्मचट यांच्यासकट आमची फौज चेन्नईत जाऊन सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, रवींद्र साठे, नंदू भेंडे आणि सागरिका यांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून परत आली. चित्रपटाचं शूटिंग उत्साहात सुरू झालं. महेशबरोबर काम करणारे सगळे त्याच्या घरचेच होऊन जातात. बहुसंख्य वेळा याचा फायदा होतो. कारण काम करणाऱ्यांना हे आपल्याच घरचं कार्य आहे अशी आपुलकी वाटत असते. अर्थात काही बाबतीत अतिपरिचयात अवज्ञाही होते. पण महेश खमक्या असल्यामुळे तो तेही निभावून नेतो.
महेशने स्वत:चे बरेच पैसे घातल्यानंतर ‘निदान’ला आर. व्ही. पंडित हा निर्माता मिळाला आणि चित्रपट पूर्ण झाला. मिक्सिंगसाठी भारतात नव्यानेच दाखल झालेलं ‘डॉल्बी’चं तंत्रज्ञान आम्ही वापरलं. ‘निदान’ रिलीज झाला. पण निर्मात्याच्या हेकेखोरपणामुळे तो नीट चालवला गेला नाही याचं आजही आम्हाला वाईट वाटतं. फार काळ दु:ख करत न बसता पुढे जात राहणे हा महेशचा मोठा गुण आहे. ‘वास्तव’वर त्याचं काम चालू झालं होतं. एके दिवशी इम्तियाझ हुसैन या लेखकाची आणि त्याची ‘वास्तव’वर चुनाभट्टीच्या घरी चर्चा चालू होती. त्यातल्या रघूची गोष्ट ऐकत असताना मला रघूच्या कॅरेक्टरमध्ये आणि महाभारतातल्या अभिमन्यूमध्ये साम्य दिसायला लागलं. महेशला एक्स्परिमेंट करायला आवडतं हे तोपर्यंत मला कळून चुकलं होतं. रघूचं थीम म्युझिक म्हणून अभिमन्यू सुभद्रेच्या पोटात असताना चक्रव्यूह-भेदाचं रहस्य ऐकतो, असा महाभारतातला एखादा श्लोक वापरण्याविषयी मी त्याला सुचवलं. गुन्हेगारी विश्वाभोवती फिरत असलेल्या व्यावसायिक चित्रपटात श्लोक वगैरे वापरण्याची कल्पना धुडकावून लावली असती एखाद्या दिग्दर्शकाने. पण महेश मूळचा थिएटर करणारा असल्याकारणाने त्याला ही वेगळी कल्पना आवडली. आम्हाला हव्या तशा अर्थाचा श्लोक महाभारतात मिळाला नाही. त्यामुळे संस्कृतचे अभ्यासक श्री. ग. देसाई यांच्याकडून तो लिहून घेतला आणि ‘वास्तव’चा मुहूर्त त्या श्लोकच्या ध्वनिमुद्रणाने झाला. ‘वास्तव’नंतर मारहाणीच्या चित्रपटांमध्येही श्लोक वापरण्याची प्रथाच पडली. ‘वास्तव’ काही कारणांनी रखडला, पण तोपर्यंत ‘अस्तित्व’ची चक्रं फिरू लागली होती.
महेशला त्याच्या प्रत्येक कामामध्ये मित्र हवेच असतात. ‘अस्तित्व’मध्येही मातब्बर तब्बूसमोर त्याने सचिन खेडेकर या नाटकाच्या दिवसांपासून त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला कास्ट केलं. एका रोलमध्ये बव्र्या आणि संगीत करायला मी! सचिननेही महेशचा विश्वास सार्थ ठरवत स्त्री-भूमिकेचं पारडं जड असलेल्या ‘अस्तित्व’मध्ये सहजसुंदर अभिनयाने आपली छाप उमटवली. ‘अस्तित्व’ हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये बनवला होता. मराठी ‘अस्तित्व’ला २००० सालचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. ‘वास्तव’ने महेशला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं, तर ‘अस्तित्व’ने समीक्षकांना या दिग्दर्शकाची नोंद घेण्यास भाग पाडलं. ‘वास्तव’ आणि ‘अस्तित्व’नंतर महेशने मागे वळून पाहिलंच नाही. गेली २१ र्वष महेश सातत्याने चित्रपट बनवतो आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं आली, पण त्यांना तोंड देत हा गडी आजही खंबीरपणे उभा आहे. आमच्यातदेखील मतभेद झाले, अनेक भांडणं झाली, अबोले झाले. पण या सगळ्यातून तावूनसुलाखून निघालेल्या मैत्रीची झळाळी काही औरच असते.
१९९५ सालच्या ‘आई’पासून २०१६ मिक्ताच्या ‘माई पुरस्कारां’पर्यंत आमच्या मीटिंग्ज महेशच्या घरी होत आल्या आहेत. मांजरेकरांच्या घरची आलेल्या पाहुण्यांना जेवल्याशिवाय न पाठवण्याची प्रथा मेधा मोठय़ा उत्साहाने चालवते आहे. तिच्या हाताला उत्तम चव आहे. असं म्हणतात की, खरी श्रीमंती पैशात न मोजता तुमच्या घराबाहेर पाहुण्यांच्या चपलांचे किती जोड असतात त्यावरून मोजली जाते. हाच निकष लावायचा झाला तर महेश आणि मेधा मांजरेकर हे जगातलं सगळ्यात श्रीमंत जोडपं आहे असं म्हटलं पाहिजे!
rahul@rahulranade.com