News Flash

बिनगरजेची ओझी!

इतकं असूनही कामं करावीत, पण यशाची काळजी सोडावी असं कोणाला वाटत नाही.

आनंदाच्या आड येणाऱ्या या काळजीबद्दल आपल्याला काय करता येईल, ते आता समजून घेऊ.

काळजीनं मनाच्या शक्तीचा ऱ्हास होतो. काळजी करता करता तिची सवय लागून ती करणं बरोबर आहे, असा भ्रमही ती निर्माण करते. आपल्याला अपयश येण्याच्या भीतीपोटी काळजी निर्माण होते. वास्तविक आपण केलेलं काम आणि त्याला मिळणारं यश-परिणाम हे नेहमी प्रमाणात असतात. त्यात भीतीला वाव नाही. स्वत:बद्दल बाळगलेल्या अवास्तव अपेक्षा, इतरांच्यात स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अवाजवी चांगल्या प्रतिमा जपण्याचे प्रयत्न – माणसाच्या मनात काळजी निर्माण करतात. ते दूर करण्यासाठी काय कराल..

आठवडय़ातून एखादा दिवस मिळालेली मोकळी संध्याकाळ. चार वाजता उन्हं उतरल्यावर यायचं आणि सात-आठ वाजेपर्यंत परत निघायचं. यासाठी घरी आलेले जुने स्नेही अर्थात आजी-आजोबा. चार ते पाच साडेपाचपर्यंतचा वेळ बरेच दिवसांनी भेटल्यामुळं नवनव्या विषयांत, गप्पांत गेला. साडेपाच होत आले, त्याबरोबर त्यातल्या आजींची चुळबुळ सुरू झाली. थोडं गप्पांत, थोडं घडय़ाळाकडं लक्ष. त्या आजींना मी लग्नाची मुलगी असल्यापासून ओळखतो. वहिनी, काकू, आजी असा त्यांचा सगळा प्रवास मी डोळ्यांसमोर पाहिलेला आहे. त्यामुळं आत्ताची चुळबुळ कशानं सुरू झाली आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणून विचारलं, ‘‘आज आहे ना अजून वेळ? अजून गप्पा, चहापाणी व्हायचं आहे!’’

त्यांचे यजमानही आमचे जुने स्नेही. त्यांनी माझ्याकडं बघितलं. दोघेही जाणून होतो. त्या म्हणाल्या, ‘‘हो. तसा अजून वेळ आहे परतायला. सूनबाईंचीही आज सुट्टीच आहे.’’ मी म्हटलं, ‘‘मग आता आज घरची कुठली काळजी आहे?’’ त्या म्हणाल्या, ‘‘तशी काळजी नाही, पण नातवाची घरी यायची वेळ झाली. सहाला तो आला म्हणजे, भुकावलेला असतो. वेळेला काही तरी गरम करून दिलं की, खाऊन साडेसहाला खेळायला जातो.’’ मी म्हटलं, ‘‘त्याची आई आहे ना घरी आज? ती नाही का काही करणार? तिची सुट्टी म्हणून तर आज आपण निवांतपणे यायचं ठरवलं!’’

त्या जरा अवघडून बोलल्या, ‘‘ते खरंच आहे, तिनं करायला पाहिजे, करीलही. पण नेमकी सुट्टी म्हणून कुठं बाहेर गेली तर? नातू काही बोलायचा नाही. पण तो तसाच पाणी पिऊन खेळायला जाईल! म्हणून आपली काळजी वाटते. तसं आता इथून निघून त्याच्या वेळत पोचता येणार नाहीच आहे.’’ आमच्या उरलेल्या तिघांच्या जे मनात येत होतं, तेच त्यांच्या मनातही येत होतं. कारण आता त्याची आई त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे, आज ती घरी आहे, आता आपण जाऊन ते करू शकणार नाही, त्याची तशी गरजही नाही. आपण ही काळजी आता उगाचच करीत आहोत. हे त्यांना स्वत:लाही जाणवत होतं. तरीही तो नातू, ती सहाची वेळ-सगळ्याची काळजी त्यांना इथं निवांत असतानाही सोडवत नव्हती.

एखादं महत्त्वाचं काम असलं, म्हणजे ते व्यवस्थित पुरं व्हावं, त्यासाठी करायच्या गोष्टी आपण वेळेत कराव्यात, त्याबरोबर होत आहेत ना, याची काळजी घ्यावी – हे सारं व्यवहार्यच आहे. पण ते तेवढं करून सोडून द्यायचं, हे मनाला मानवत नाही. जे जे म्हणून करणं आवश्यक आहे, आपल्या हातात आहे, ते सारं करून झाल्यानंतरसुद्धा मनाला त्या संपलेल्या कामात पुन्हा अडकवून ठेवणारी वृत्ती म्हणजे – काळजी! प्रत्येक कामाचं पुढं काय होणार-असले विचार निर्माण करून माणसाचा कामाचाच नव्हे, तर झोपेचाही वेळ घालवणारी काळजी म्हणजे एक अनुत्पादक उद्योग होऊन बसतो! त्याचं वैशिष्टय़ हे की, त्याचीसुद्धा माणसाला नुसती सवयच नव्हे, तर मनाला काळजी करण्याची हळूहळू आवडही लागते. असल्या काळजी करण्याच्या उद्योगातून काही निष्पन्न होत नसतं, ते लक्षात येतं, तरी नकळत काळजी करीत राहण्याची मनाला खोड लागते. त्यानं इतर कामांचं नुकसान होत असतं. त्यात लक्ष लागत नाही, ती वेळेला होत नाहीत, तरी माणसाकडून ही काळजीची बिनगरजेची ओझी वर्षांनुर्वष वाहिली जातात.

लहानपणी बाराखडी शिकताना आपण ओ-ओझेवाला घोकलेलं असेल. त्या बिचाऱ्याला रोजच्या अन्नपाण्यासाठी पाठीवर पोत्याचं ओझं घेऊन, उन्हातान्हाचं दिवसभर राबत राहावं लागतं, घाम गाळावा लागतो, तेव्हा कुठं दिवसाच्या आमटी-भाकरीची सोय होते. त्याच्या ओझं वाहण्याला कारुण्याची किनार असली तरी, ते त्याच्यासाठी गरजेचं आहे. पण आपण वाहत असलेल्या काळजीत कुठं अन्नपाण्याचा, निर्वाहाचा, घरादाराचा, मुलाबाळांचा प्रश्न नाही, कुठलं कर्तव्य नाही, हलक्या मनानं आनंदानं जगण्याची संधी आहे. तरीसुद्धा ही अनावश्यक काळजीची ओझी वाहून आपण का दमतो, याचा वेळीच विचार करणं गरजेचं नाही का ?

घरोघरी अशा असंख्य आजी, आई, वहिनी, इतकंच नव्हे तर, मुलं, मुली, वडील, आजोबा, नोकर-मालक, बॉस – आपल्याला पाहायला मिळतात. ते या काळजीच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस, वर्षांनुर्वष वाकलेले असतात. त्यापोटी त्यांनाच त्रास होतो, चिडचिड होते, इतरांचं स्वास्थ्य जातं. त्यातल्या अनेकांना आपण होऊन, विनाकारण, पाठीवर घेऊन वाहिलेल्या या ओझ्यांची कल्पना आली तर, किती तरी लहान-थोर व्यक्ती या ओझ्यातून मुक्त होतील. मिळालेल्या, मिळवलेल्या गोष्टींचा आनंद घेत जगू शकतील.

माणसाच्या आयुष्यात त्या त्या टप्प्यावर रास्त असलेल्या गोष्टी होत जाणं, हा निसर्गक्रम आहे. त्या होण्यासाठी आपल्याकडून जे करायचं ते करणं, हे त्याचं कर्तव्यही आहे. चांगल्या तऱ्हेनं पास होण्यासाठी उत्तम अभ्यास, वेळेचं नियोजन, चांगली प्रकृती, उत्तम मार्गदर्शन – हा तर साधा सरळ निसर्गक्रम आहे. तो मनापासून व्हावा म्हणून, मनाची साथ मिळणं-घेणं हे गरजेचंच आहे. पण आपल्या लक्षात येईल की, या निसर्गक्रमात काळजीला कुठं स्थान नाही. कामाला आहे, वेळेला आहे, कौशल्याला आहे! ते सारं केल्यानंतर, त्याचा परिणाम म्हणून परीक्षेत मिळणारं यश हेही, या निसर्गक्रमाचा एक भाग आहे.

इतक्या सरळ असलेल्या गोष्टीत शिरकाव करून मन अपेक्षित यश मिळेल की नाही, विशिष्ट साइडला जाता येईल की नाही – असला एखादा मुद्दा उत्पन्न करून, मुलालाच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांपासून सगळ्यांना हा काळजीचा उद्योग कधी निर्माण करतं, तेही कळत नाही. अनेकदा तर त्यामुळं निसर्गक्रमानं चाललेल्या अभ्यासापासून परीक्षेपर्यंतच्या सगळ्या कामांवर विपरीत परिणाम होऊन, ही अनावश्यक काळजी सर्वाच्या मनावर ताणाचं ओझं निर्माण करते. तिच्यामुळं मिळू शकणारे मार्क वाढणं सोडा, कमीच होतात.

इतकं असूनही कामं करावीत, पण यशाची काळजी सोडावी असं कोणाला वाटत नाही. वास्तविक परीक्षेतला शेवटचा पेपर टाकेपर्यंत, आधी म्हटलं तशी, सगळी कर्तव्यं करण्याची गरज आहे. ती केल्यावर मात्र आता निकालापर्यंत मुलाला, आई-वडिलांना, संबंधितांना आनंदानं दुसरं एखादं चांगलं काम करता येण्यासारखं आहे. कला, कौशल्य शिकेल, एखादा शॉर्ट टर्म कोर्स करील. निकालाच्या दिवशी निकाल पाहील! त्यानुसार पुढची दिशा आणि कामं सुरू करील. पण मन असा सरळ, निर्वेध असलेला प्रवास त्याला करू देत नाही. परीक्षा संपली तरी, त्याची अकारण सुरू असलेली काळजी निकालाच्या आदल्या दिवशी शिगेला पोचलेली असते. मनाची एवढी शक्ती या काळजीवर खर्च होऊनसुद्धा मार्कावर त्याचा एक टक्काही परिणाम होणार नसतो. पण यापोटी उत्पन्न झालेली काळजी ना मुलाला सोडीत, ना आई-वडिलांना!

ओझेवाल्यांनी टोच्या लावून पाठीवर घेतलेलं पोतं, तो योग्य जागा आली की, तिथं ठेवून मोकळा होतो. तो आता ओझेवाला राहत नाही! पण वेळोवेळी त्या त्या टप्प्यावर ती ती कामं करूनही चाळिशीत-साठीत-नव्वदीतसुद्धा मनुष्य काळजीरहित असेल, चित्तानं हलका असेल, मोकळा असेल, अशी शक्यता नाही.

काळजीनं मनाच्या शक्तीचा ऱ्हास होतो. काळजी करता करता तिची सवय लागून ती करणं बरोबर आहे, असा भ्रमही ती निर्माण करते. इतकंच नव्हे, तर माणसाला काळजी करण्याला, त्या अर्थानं विषय उरला नसला, तरी विषय शोधून शोधून मनुष्य त्यावर काळजी करतो. नसला तरी उत्पन्न करून देणारे लोकही असतात. ते नसलेला विषय त्याच्या डोक्यात आणून त्याला काळजीत ढकलतात. काळजी एका मर्यादेपलीकडं गेली, म्हणजे ते ओझं माणसाला सहन होत नाही, मग वेगवेगळ्या प्रकारचे मनोकायिक आजार उद्भवतात. आनंदाच्या आड येणाऱ्या या काळजीबद्दल आपल्याला काय करता येईल, ते आता समजून घेऊ.

आपल्याला अपयश येण्याच्या भीतीपोटी काळजी निर्माण होते. वास्तविक आपण केलेलं काम आणि त्याला मिळणारं यश-परिणाम हे नेहमी प्रमाणात असतात. त्यात भीतीला वाव नाही. स्वत:बद्दल बाळगलेल्या अवास्तव अपेक्षा, इतरांच्यात स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अवाजवी चांगल्या प्रतिमा जपण्याचे प्रयत्न – माणसाच्या मनात काळजी निर्माण करतात. त्याबाबतीत आपण जसे जेवढे आहोत, ते धर्यानं स्वीकारण्यानं-सांगण्यानं भीती, काळजी दूर होतात. प्रत्येकाला प्रगतीला वाव असला, तरी कुवत ओळखून प्रगतीची ध्येयं ठेवली तर, काळजीचं ओझं निर्माण होत नाही. अर्थातच सत्याला सामोरं जाण्याच्या धर्याचा अभाव, अमुक एका मार्गानं गोष्टी घडल्या तरच आपल्या आयुष्यात आपण यशस्वी होऊ शकू अशा कल्पना, त्यातून पुढं पसा-प्रतिष्ठा-मानमान्यता यांचा लोभ – असल्या गोष्टी माणसाला प्रत्येक टप्प्यावर काळजीत नेऊन टाकतात. हे समजून घ्यावं. आजवर लागलेल्या काळजीच्या अनावश्यक सवयीमुळं, या काळजीच्या ओझ्यातून सुटणं थोडं अवघड जाईल, पण अशक्य नाही!

कर्तव्यांच्या प्रमाणात मनुष्य कामांची ओझी वाहील, पण नकळत काळजी निर्माण करण्याची मनाची सवय समजून घेतली, तर काळजीचं बिनगरजेचं ओझं वाहणार नाही. मग आयुष्याचा प्रवास हलका आणि आनंदी होईल!

सुहास पेठे drsspethe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:40 am

Web Title: suhas pethe marathi articles on dealing with worry and anxiety
Next Stories
1 तक्रार!
2 आजचं ‘आज’!
3 समजून घेऊ या – ‘बदल’!
Just Now!
X