03 August 2020

News Flash

आत्मविश्वास असेल तर यश तुमचेच

मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेताना कष्टाची जोड आत्मविश्वासाला दिली तर यश नक्की मिळते

‘यश मिळत गेले तर आत्मविश्वास वाढतोच, पण आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते’

‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ अशा वृत्तीचा सुभान हा कमी शिकलेला, खेडय़ातून आलेला तरुण एका मोठय़ा हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करायला आला होता. ते करताना वर्षभरातच त्याने निरीक्षण केले. स्वच्छतेचा अभाव, नोकरांची कमतरता यामुळे चांगली सेवा दिली जात नाही. रुग्ण, परिचारिका, डॉक्टर्स सगळ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. हे त्याने हेरले व मालकाला याविषयी सांगितले. ‘‘मला वेळ नाही, आणखी दोन कॅन्टिन्स मी चालवतो. तुला काही करायची इच्छा असेल तर जरूर कर. मला माझ्या नफ्याची रक्कम मात्र प्रामाणिकपणे देत जा.’’ मालकाचे हे उत्तर ऐकून सुभान आनंदला. प्रशिक्षण घेतलेले चारसहा नोकर त्याने ठेवले. ‘कसे होणार?’ ही धाकधूक मनात असली तरी ‘आपण हे करू शकतो’ हा स्वत:विषयीचा विश्वास मोठा होता. सहा महिन्यात चित्र पालटले. सर्वाकडून शाबासकी तर मिळालीच, पण रुग्णांचे नातेवाईकही जेवायला येऊ लागले. परिचारिकांनी घरून डबा आणणे बंद केले. व्यवसाय वाढला. बुद्धीचा, चालून आलेल्या संधीचा वापर आत्मविश्वासाने केल्यामुळेच हे होऊ  शकले.

मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेताना कष्टाची जोड आत्मविश्वासाला दिली तर यश नक्की मिळते. आपल्याला बढती मिळण्यायोग्य परिस्थिती आहे, हे लक्षात आल्यावर आत्मविश्वासपूर्ण वागण्यातून कामाच्या जागी हे दाखवून दिले गेले की, बढतीनंतर जी जबाबदारी येईल ती यशस्वीपणे आपण नक्की पार पाडू, तर बढती नक्की मिळेल. यशाची ती गुरुकिल्ली ठरेल. मोनिका ही महत्त्वाकांक्षी, हुशार आहे. पण तिच्यात वैगुण्य किंवा स्वभावदोष आहे तो म्हणजे भिडस्तपणा, आत्मविश्वासाची कमतरता. सर्वाना वाटते हिला हे करायचे नाही, काम यशस्वीपणे करू याचा तिला आत्मविश्वास नाही. शाळेत गणित, भौतिकशास्त्र हे महत्त्वाचे विषय ती शिकवते. पुढील वर्षी प्राध्यापिका निवृत्त होणार हे सर्वाना ठाऊक होते. मोनिका प्राध्यापिकेची जबाबदारी लीलया सांभाळेल हे शाळेतील सहकाऱ्यांप्रमाणे घरच्यांनाही माहीत होते. तिने वर्षभर शाळेतील प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलावा, शिक्षकांचे प्रश्न, अडचणी यात लक्ष घालावे, पालकांबरोबरचा संवाद वाढवावा, शिक्षण खात्याकडे प्रलंबित असलेली कामे करून घ्यावी, अशी अनेक कामे करायला सुरुवात करावी, आत्मविश्वास आपोआप वाढेल. असे सर्वानी सांगितलेले तिला पटले. तिने आत्मविश्वासाने कामे करण्यास सुरुवात केली. शर्यतीत असलेल्या इतरांना धक्का बसला, वाईटही वाटले, कारण हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा मोनिकाचा स्वभावही त्यांना माहीत होता. एक गोष्ट यशस्वी झाली की, तिचा आत्मविश्वास द्विगुणीत होई. अर्थातच पुढील वर्षी पूर्ण आत्मविश्वासाने प्राध्यापिकेच्या पदासाठी दावा केला आणि तो मान्य झाला, हे सांगायला नको.

 

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2016 1:04 am

Web Title: self confidence
Next Stories
1 मैत्री फक्त रुजवायची असते
2 चुकीची कबुली
3 कडू घोटांचा गोडवा
Just Now!
X