08 August 2020

News Flash

शिक्षक

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार शिक्षकच देतात.

मुलांच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्व खूप असते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार शिक्षकच देतात. मुलांचे मन वाचता येणे ही यशस्वी शिक्षक होण्याची किल्ली म्हणावी लागेल. मोनाली ही चारचौघींसारखी मुलगी. तिच्या शिक्षिका होत्या स्नेहा. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ही तिला मिळालेली देणगी होती. स्नेहा तिच्यावर मेहनत घेत. काय वाचावे, चर्चासत्रांमध्ये भाग घेताना कसे बोलावे, वक्तृत्व स्पर्धा जिंकण्याकरिता काय करावे वगैरे अनेक टिप्स देत असत. पण मोनालीला चांगले यश मिळत असूनही ती असावी तेवढी   प्रफुल्लित नसे. तिच्या मनात काय असावे याचा विचार करताना एकदा त्यांना ती वर्गातील देखण्या समजल्या जाणाऱ्या, मौजमजा करणाऱ्या, चित्रपटांवर चर्चा करणाऱ्या आणि तसे वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलींबरोबर उभी असलेली दिसली. ही गप्प होती, बाकीच्यांचा चिवचिवाट सुरू होता. त्यांना लगेचच तिची मन:स्थिती लक्षात आली.  या मुलींप्रमाणे मी नाही, ही टोचणी तिला होती. पण तो न्यूनगंड स्नेहा यांनी काढून टाकला. नंतर होणाऱ्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेकरिता तिची छान तयारी त्यांनी करून घेतली. अपेक्षेप्रमाणे पहिले बक्षीस मोनालीला मिळाले.  एका हुषार मुलीचे मन वाचून तिच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम एका शिक्षकाने केले होते.

नेताजी विद्यालयात प्रवीण सर मुलांना खेळ शिकवतात. कबड्डी, फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांमध्ये मुलांना प्रावीण्य मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. मिलिंद हा विद्यार्थी फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खूप रस घेऊन पाहतो. एखाद्या खेळाडूने चूक केली तर, ‘याने हा चुकीचा शॉट मारला, असे करायला नको होते’ हे भाव मिलिंदच्या चेहऱ्यावर दिसायचे. किंवा कोणी अगदी अनपेक्षित गोल मारला तर, ‘अरे वा! सुंदर, अप्रतिम!’ असे एक्स्प्रेशन, टाळ्या वाजविणे यातून तो आपले मत, कौतुक प्रकट करायचा. प्रवीण सरांच्या लक्षात आले की, मिलिंदला दोन्ही खेळातील अनेक गोष्टी चांगल्याच माहीत आहेत. त्यांना प्रश्न पडला, हा मुलगा नेहमी दूर बसून खेळ पाहतो, खेळायला का येत नाही? न्यूनगंड असावा त्याला, हा विचार करून सरांनी त्याला एकदा खेळामध्ये भाग घ्यायला बोलावले. तो म्हणाला, ‘‘सर, दोन्ही टीम्समधील मुले माझ्यापेक्षा खूप उंच, अंगापिंडाने मजबूत आहेत. धावा काढताना, गोल करताना या गोष्टींचा त्यांना फायदा होतो. माझी उंची कमी असल्यामुळे मी कोणत्याही डावात चांगली कामगिरी करू शकणार नाही.’’ सर गप्प राहिले. त्याला खेळविण्याच्या संधीची वाट पाहण्याचे त्यांनी ठरवले. दोनच दिवसांनी क्रिकेट टीममधील एक खेळाडू सरावाकरिता आला नाही. सरांनी मििलदला फलंदाजी करायला बोलावले. त्याने गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. भरपूर धावा काढत विरोधकांना नामोहरम केले. त्याच्या मनातील, इतरांच्या मानाने आपण कमी असल्याची भावना काढून टाकण्यात सरांना यश आले. पुढे जाऊन त्यांनी त्याला जास्त प्रशिक्षण देऊन त्याचे कौशल्य धारदार केले.  एक उत्तम खेळाडू तयार केला. विद्यार्थ्यांच्या मनातील विचार वाचणे यात कलेचा भाग थोडा आहे. विद्यार्थ्यांचे वागणे, बोलणे याचे निरीक्षण करणे, तो काय वाचतो याकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टीतून हाडाचा शिक्षक विद्यार्थ्यांचे मन वाचू शकतो आणि यातूनच चांगले विद्यार्थी तयार झाले की शिक्षकांना ते स्वत: यशस्वी झाल्याचे समाधान मिळते.

 

geetagramopadhye@yahoo.com

गीता ग्रामोपाध्ये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2016 1:01 am

Web Title: teacher
Next Stories
1 कर्म हीच ओळख
2 अतिझोप, आळस दारिद्रय़ास कारण
3 विश्वास
Just Now!
X