मराठी सिनेरसिकांचा गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याचा आज दहावा स्मृतिदिन. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आठवणीतल्या लक्ष्या तुला विसरणं कुणालाही शक्य नाही, असेच म्हणावे लागेल.
सा-या रसिकांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी चित्रपटातच नाहीतर नाटक आणि हिंदी चित्रपटातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. रंगभूमीवरील ‘टुरटुर’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचे पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘शांतेचं कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून त्यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल ठेवले आणि बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे हे लहानथोरांचा ‘लाडका आणि हवाहवासा लक्ष्या’ बनले. अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती. त्यांनी विनोदी भूमिका जितक्या सहजतेने आणि लीलया निभावल्या तितक्याच निष्ठेने अनेक गंभीर भूमिकांनाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणा-या अशा गंभीर भूमिका त्यांच्या वाट्याला फार कमी आल्या. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का कायम राहिला. १९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ चित्रपटातून त्यांनी ख- या अर्थाने धुमधडाका केला. लक्ष्मीकांत, अशोक सराफ आणि महेश कोठारे या तिघांच्या अभिनयाची भट्टी अशी काय जमली की नंतरच्या काळात महेश कोठारे यांनी लक्ष्याला घेऊन चित्रपटांचा धडाकाच लावला. त्यांच्या चित्रपटांमधून त्यांनी ख-या अर्थाने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले. धुमधडाकानंतर ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधून ‘लक्ष्या-महेश’ या जोडीची जादू पाहायला मिळाली. त्याचवेळी लक्ष्या, सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ, या त्रिकूटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘भूताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’ अशा अनेक चित्रपटात या तिघांची धम्माल रसिकांनी अनुभवली. त्यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरक्षा फिदा झाले. मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांच्या वाट्याला फार काही आल्याच नाहीत. मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्मीकांत यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्यांनी छान निभावली. असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेला कलाकार चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिला.
First Published on December 16, 2014 3:25 am