अभिनेता सलमान खानविरुद्ध सत्र न्यायालयात सुरू असणाऱ्या हिट अँड रन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सोमवारी साक्षीदारांच्या यादीतील हॉटेल वेटरने सलमान खानला ओळखले. अपघातापूर्वी सलमान आणि त्याच्या मित्रांनी जुहू येथील पंचतारांकित जे.डब्ल्यू.मॅरिएट हॉटेलमधील ‘झेन बार’मध्ये बसून मद्यपान केले होते. त्यानंतर साधारण एक तासानंतर दारूच्या नशेत गाडी चालवताना वांद्रे येथील पदपथावर झोपलेल्या व्यक्तींना सलमान खानने गाडीखाली चिरडले होते. न्यायमूर्ती डी. डब्ल्यू. देशपांडे यांना साक्ष देताना मोलाय बॉगने आपण सलमान आणि त्याच्या मित्रांना अपघाताच्या रात्री मद्य सर्व्ह केल्याचे सांगितले. यावेळी सलमान खान आणि त्याच्या मित्रांनी कॉकटेल आणि मद्याची मागणी केल्याचेसुद्धा मोलाय बेगने आपल्या साक्षीत सांगितले. मात्र, त्यावेळी सलमान खानने मद्यपान केले अथवा नाही याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नसल्याचे मोलायने सांगितले. बचावपक्षाच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणीदरम्यान बारमधील अंधुक प्रकाशामुळे सलमान खान आणि त्याच्या मित्रांपैकी नक्की कोणी मद्यपान केले याविषयी निश्चित माहिती नसल्याचे मोलायने म्हटले. यावेळी पोलिस हवालदार लक्ष्मण मोरे यांचीसुद्धा साक्ष घेण्यात आली. हा अपघात झाला त्यावेळी सलमानचा भाऊ सोहेल खानचे अंगरक्षक म्हणून लक्ष्मण मोरे खान कुटुंबियांच्या निवासस्थानी तैनात होते. त्यादिवशी सोहेल आणि सलमान एकत्र ‘रेन बार’मध्ये गेले होते, मात्र मध्यरात्रीनंतर सोहेल खान एकटाच घरी परतला. त्यानंतर रात्री ३च्या सुमारास एका माणसाने येऊन सलमानच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी दिल्याचे लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.