06 March 2021

News Flash

खडतर वर्षांची अखेर

नोटाबंदीचा फटका या वेळी नाटय़व्यवसायालाही बसला.

मराठी रंगभूमीसाठी यंदाचे वर्ष खडतर ठरले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही काही हातावर मोजण्याइतकी नाटकं व्यावसायिकरीत्या यशस्वी ठरली, तर काही नाटकांना गाशाही गुंडळावा लागला, तर काही नाटकं नव्याने आलीही. पण या वर्षांत नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ या दोन गोष्टींमुळे हे वर्ष खडतर गेले.

नोटाबंदीचा फटका या वेळी नाटय़व्यवसायालाही बसला. लोक या निर्णयाने त्रस्त होते, त्याचा विपरीत परिणाम नाटकांवरही झाला. काही निर्मात्यांनी डेबिट कार्ड वापरण्याची तयारीही दाखवली. पण फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या निर्णयामुळे निर्मात्यांचे नुकसान झालेच, पण त्याबरोबर सर्वात मोठे नुकसान झाले ते रंगमंच कामगारांचे. कारण त्यांच्याकडे फक्त हेच काम असते आणि मानधनही जेमतेम असल्यामुळे त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न हा घर चालवण्याचा होता. नाटय़क्षेत्रात स्पष्टवक्ते असलेले अशोक मुळ्ये आणि अभिनेत्री, निर्माती मुक्ता बर्वे यांनी या कामगारांना मदतही केली. नोटाबंदीच्या समस्येतून हा व्यवसाय बाहेर पडतोय असे वाटत असतानाच ‘जीएसटी’ करामुळे पुन्हा एकदा नाटय़ क्षेत्र बॅकफूटवर ढकलले गेले. ‘जीएसटी’ समजून घेण्यापासून ते त्याचा क्रमांक मिळवण्यापर्यंत साऱ्या गोष्टी निर्मात्यांना कराव्या लागल्या. त्यामुळेच या वेळी गणेशोत्सवात नाटकांचे जास्त प्रयोग होऊ शकले नाहीत. कारण ‘जीएसटी’ भरायचा कोणी, या वादामुळे नाटकांची मागणी घटली. ‘जीएसटी’मुळे तिकिटांचे भाव कायम ठेवणे हे निर्मात्यांना त्रासदायक गेले.

व्यावसायिक रंगभूमीवर काही नाटकांनी चांगलाच जोर धरला. यामध्ये तीन पायांची शर्यत, कोडमंत्र, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, साखर खाल्लेला माणूस, गेला उडत, वेलकम जिंदगी, अमर फोटो स्टुडिओ, एक शून्य तीन, के दिल अभी भरा नही यांसारख्या व्यावसायिक नाटकांना चांगली मागणी पाहायला मिळाली. संगीत नाटकांमध्ये कटय़ार काळजात घुसली, मत्स्यगंधा, त्यानंतर संगीत शंकरा आणि आता देवबाभळी यांना चांगला प्रतिसाद मिळाला. प्रायागिक रंगभूमीवर सातत्याने आविष्कार संस्थेकडून प्रयोग होतच राहिले. मोहित टाकळकरचे ‘गज’ब कहानी, या नाटकाने एक वेगळाच प्रयोग सर्वासमोर मांडला. सर्जनशील नाटककार मकरंद देशपांडे यांनी लोकांकिकेच्या व्यासपीठावर केलेल्या ‘स्पॉट ऑन’ या नाटकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. भाऊ कदमसारख्या अभिनेत्याने एका दिवसात चार प्रयोग केले. हर्बेरियमसारख्या नाटय़संस्थेने पती गेले ग काठेवाडी, या नाटकाने रंगभूमीवर जोरदार पुनरागमन केले. वर्षअखेरीस अनन्या, अशीही श्यामची आई, अंदाज अपना अपना, हम पांच, अशी काही नाटकं रंगभूमीवर आली. समाजस्वास्थ्यसारखं सकस नाटक पाहण्याचा योगही या वेळी रसिकांना मिळाला.

कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. नाटय़, संगीत, चित्र यांसारख्या ललित कलांची देणगी कोकणच्या लाल मातीला आहेच. या साऱ्या परंपरेला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले ते आचरेकर प्रतिष्ठानने. या वर्षी रौप्य महोत्सवात बहुभाषिक नाटके सादर करण्यात आली. त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह आणि हबीब तन्वीर यांच्या नाटकांचाही या महोत्सवात समावेश करण्यात आला होता. ‘आइनस्टाइन’ या एकपात्री प्रयोगात नसीर यांनी जे रसिकांना खिळवून ठेवले, ते शब्दांकित करणे कठीणच. नसीर यांच्या मोटले ग्रूपने ‘गधा और गड्ढा’ या नाटकाने चाहत्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले. नसीर यांच्यासारखा ज्येष्ठ नट या प्रतिष्ठानच्या प्रेमात पडला, यातच सारे काही आले.

नाटकाच्या निर्मात्यांपुढे जसे नोटाबंदी आणि जीएसटी, हे दोन मुख्य प्रश्न होते, तसेच अन्य समस्याही होत्या. नाटकांच्या तालमीला चांगले सभागृह मुंबईत उपलब्ध झाले नाही. निर्मात्या संघाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. नाटक ही एक कला आहे आणि या व्यवसायात आल्यावर तुमच्यामध्ये चांगले स्पिरिट असायला हवे, ते मात्र अजूनही जाणवत नाही. सांस्कृतिक मंत्र्यांनी या समस्या कितपत निकाली काढल्या, याचे उत्तर मिळालेले नाही. मराठी रंगभूसाठी हे वर्ष फारसे चांगले गेले नसले, तरी पुढचे वर्ष मात्र चांगल्या प्रयोगांचे जावो, एवढीच अपेक्षा नाटय़चाहते व्यक्त करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 12:38 am

Web Title: 2017 year of marathi play gst demonetization effect on marathi play
Next Stories
1 इंग्लिश विंग्लिश : फलक आणि रागाची गोष्ट!
2 फ्लॅश बॅक
3 मागे वळून पाहताना..
Just Now!
X