News Flash

बहारदार ‘चतुरंगी’ कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

दुपारपासूनच रसिकांची पावले महोत्सवाच्या मंडपाकडे वळू लागली.

६५ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या स्वरयज्ञास प्रारंभ

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरांतून साकारलेल्या ‘या कुन्देन्दू तुषार हार धवला’ या सरस्वतीवंदनेचे सूर.. मंगलमय स्वरांची अनुभूती देणारे सनईवादन.. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ या पंडितजींनी अजरामर केलेल्या भजनाचे गायन.. ‘चतुरंगी’ वादनातून साकारलेली ‘बाजे मुरलिया बाजे’ या भजनाची धून.. बनारस घराण्याची गायकी आणि बहारदार बासरीवादन.. अशा चतुरंगी कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध होत स्वर-ताल-लयीच्या दुनियेत हरवून गेले. ६५ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या स्वरयज्ञास बुधवारी कलाविष्काराची ओंजळ रसिकांच्या चरणी सादर करीत प्रारंभ झाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. दुपारपासूनच रसिकांची पावले महोत्सवाच्या मंडपाकडे वळू लागली. रसिकांच्या अमाप उत्साहामध्ये कलाकारांचा कलाविष्कार रंगला. तोंडाच्या कर्करोगावर मात करीत मधुकर धुमाळ यांनी सादर केलेल्या सनईवादनाने महोत्सवाची नांदी झाली. गानसरस्वती किशोरी आमोणकर, ज्येष्ठ गायिका गिरीजा देवी, ज्येष्ठ धृपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर, भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर, संगीत शिक्षक व सतारवादक तुलसीदास ताजपूरिया, तबलावादक नारायणराव जोशी, संगीत अभ्यासक डॉ. गोपाळराव मिरीकर, ज्येष्ठ गायक शंकर कृष्ण जोशी, संगीततज्ज्ञ डॉ. एम. सी. दीक्षित, ज्येष्ठ सारंगीवादक ध्रुव घोष, सतारवादक रसिक हजारे, तबलावादक पं. सदाशिव पवार, गायिका रजनी करकरे, संगीतगुरू शोभा गुर्जर, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, मंडळाचे कार्यकर्ते सुधीर वझे, शशिकांत चाफळकर, वाद्यवृंद गायिका रश्मी देढिया, लावणीसम्राज्ञी छबुबाई मुसळे, संगीत शिक्षिका शकुंतला पाटणकर, सतारवादक श्रीनिवास केसकर, तबलावादक सुरेश बेलसरे, सतारवादक नीला कानडे, पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य शरद पेठे, तबलावादक प्रमोद भडकमकर या वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आनंद देशमुख यांनी निवेदन केले.

माझी ओळख पंडितजींमुळेच

माझे अस्तित्व आणि ओळख हीच मुळी पं. भीमसेन जोशी यांच्यामुळे आहे, अशी भावना मूळचे दिल्लीचे आणि सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असलेले डॉ. विजय राजपूत यांनी व्यक्त केली. ‘सवाई गंधर्व : व्यक्तित्व एवम् कृतीत्व’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी दिल्ली विद्यापीठाची पीएच. डी. संपादन केली आहे. डॉ. मंजुश्री त्यागी या गाईड असल्या तरी प्रबंधासाठी खरे मार्गदर्शन पं. भीमसेन जोशी यांचे लाभले, अशी कृतज्ञता राजपूत यांनी व्यक्त केली. १९९१ मध्ये गायक होण्याचे आणि तेही पं. भीमसेन जोशी यांचा शिष्य होण्याचे स्वप्न मी पाहिले होते. दोन वर्षे पंडितजी यांनी माझी परीक्षा घेतली. दिल्ली येथे एका मैफलीसाठी आलेल्या गुरुजींनी पत्रकारांसमोर माझी ‘मेरा नया शागीर्द’ अशी ओळख दिली आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण ठरला. लंडन येथील न्यू कॅसल विद्यापीठामध्ये गायन विभागाचे अध्यापन करीत असून पंडितजींच्या आशीर्वादानेच माझी कारकीर्द घडली, असे राजपूत यांनी सांगितले. या मैफलीमध्ये राजपूत यांना तानपुऱ्यावर साथसंगत करणारे प्रा. डेव्हिड क्लार्क हे न्यू कॅसल विद्यापीठामध्ये वाद्यवादनाचे अध्यापन करतात. मी पियानो आणि व्हायोलिनवादक आहे. २००६ मध्ये या महोत्सवात मी रसिक म्हणून आलो होतो. पं. भीमसेन जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना विद्यापीठातील अध्यापन कार्याची माहिती दिली होती. भारतीय संगीताची जादू गेल्या काही वर्षांपासून मी अनुभवत असून त्याद्वारे आध्यात्मिक अनुभूती मिळते. गुरूंना तानपुऱ्याची साथसंगत करण्याचा माझा अनुभव अविस्मरणीय होता, असे क्लार्क यांनी सांगितले.

मंडळाला तानपुऱ्यांची भेट

बाळासाहेब मिरजकर आणि साजिद मिरजकर यांच्यातर्फे आर्य संगीत प्रसारक मंडळाला आठ तानपुऱ्यांची सोनेरी भेट देण्यात आली. सोन्याचा मुलामा असलेल्या या तानपुऱ्यांवर उस्ताद अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांच्या प्रतिमा लाकडात कोरलेल्या आहेत. मिरजकर बंधूंची ही आठवी पिढी तानपुऱ्यांची निर्मिती करण्यामध्ये पारंगत आहे. आजोबा-नातवाची जोडी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरुवातीपासून तानपुरे जुळवून देण्याचे काम करीत आहे. भेट देण्यात आलेल्या तानपुऱ्यांचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू होते. तून लाकडापासून तानपुरे तयार करण्यात आले असून हे लाकूड केवळ मिरज, मंगळवेढा येथेच मिळते, अशी माहिती मिरजकर यांनी दिली. त्यावरील नक्षीकाम ओंकार इनामदार यांनी केले आहे. तानपुऱ्याचे नक्षीकाम पुण्यात तर भोपळे निवडण्यापासून बांधणीपर्यंतचे काम मिरजेला झाले. तानपुऱ्याच्या तारा तुटू नयेत, यासाठी रासायनिक रंगांचा वापर टाळून फुलांपासून बनवलेले नसíगक रंग वापरण्यात आले आहेत. मिरजकर घराण्याशी आमचा तीन पिढय़ांपासून सबंध आहे. तानपुरे तयार करण्याचे शास्त्र त्यांनी विकसित केले आहे. त्यांनी मंडळाला दिलेली भेट अविसमरणीय आहे, अशी भावना श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली.

महोत्सवाचे सुवर्ण संचित पेन ड्राईव्हमध्ये जतन

सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतील कलाविष्काराचे संचित रसिकांसाठी ‘पेन ड्राईव्ह’च्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. फाउंटन म्युझिक कंपनीने निर्मिलेल्या या पेन ड्राईव्हचे श्रीनिवास जोशी, उपेंद्र भट आणि आनंद भाटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. १९९२ मध्ये या महोत्सवात पन्नासहून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या अडीचशे रागांचे गायन-वादन समाविष्ट असलेल्या पेन ड्राईव्हमध्ये ८० तासांचे ध्वनिमुद्रण आहे. महोत्सवामध्ये हे पेन ड्राईव्ह सवलतीच्या किमतीत उपलब्ध होणार असल्याचे निवेदक आनंद देशमुख यांनी सांगितले.

महोत्सवात आज (दुपारी ४)

  • भुवनेश कोमकली (गायन)
  • कला रामनाथन (व्हायोलिन)
  • कौशिकी चक्रवर्ती (गायन)
  • संगीतमरतड पं. जसराज (गायन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 3:06 am

Web Title: 65th sawai gandharva bhimsen mahotsav started in pune
Next Stories
1 पाऊले चालती..
2 मधुकर धुमाळ यांच्या सुरेल सनई वादनाने सवाई गंधर्व महोत्सवाला प्रारंभ
3 विराट- अनुष्काच्या लग्नातील रणबीर कपूरचा फोटो पाहिलात का?
Just Now!
X